कोरोना काळात पोलिसांमुळे वाचला ९८ जणांचा संसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:06 AM2021-06-10T04:06:16+5:302021-06-10T04:06:16+5:30

महिला सहाय्य कक्ष बनले कुटुंबप्रमुख लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या काळात ‘वर्क फ्रॉम होम’ आणि लॉकडाऊनमुळे पती-पत्नी २४ ...

During the Corona period, the lives of 98 people were saved due to the police | कोरोना काळात पोलिसांमुळे वाचला ९८ जणांचा संसार

कोरोना काळात पोलिसांमुळे वाचला ९८ जणांचा संसार

Next

महिला सहाय्य कक्ष बनले कुटुंबप्रमुख

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या काळात ‘वर्क फ्रॉम होम’ आणि लॉकडाऊनमुळे पती-पत्नी २४ तास चार भिंतीआड अडकले. त्यामुळे काहींचा संसार फुलला तर काही पती-पत्नींमधील वाद वाढून विकोपाला गेला. अशात अनेकांनी थेट घटस्फोटापर्यंत जाण्याचे पाऊल उचलले. मात्र, या कठीण काळात मुंबई पोलिसांच्या महिला अत्याचारविरोधी कक्षाने ९८ जणांच्या संसाराची विस्कटलेली घडी पुन्हा व्यवस्थित केली आहे.

लॉकडाऊनमध्ये अनेकांचे उद्योगधंदे बुडाले, नोकऱ्या गेल्या. तर अनेकांची कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर येऊन ठेपली आहेत. लॉकडाऊन काळात सगळ्यांना आपल्या मनाविरुद्ध घरात राहणे भाग पडले होते. या काळात कधी नाही इतका वेळ पती-पत्नींनी एकत्र घालवला. कुठे संवादामुळे नात्यातला गोडवा वाढला, तर कुठे याच एकत्रपणामुळे अनैतिक संबंधांचे बिंग फुटले आणि त्यातून निर्माण झालेले वाद पोलीस ठाण्यापर्यंत जाऊन घटस्फोटपर्यंत पोहोचले. दुसरीकडे, छोटी-छोटी कारणेही वाद होण्यास पुरेशी ठरू लागली आणि काही ठिकाणी महिलांवरील मानसिक, शारीरिक अत्याचार वाढले.

अशा पीडित महिलांना न्याय देण्यासाठी पोलिसांचे महिला अत्याचारविरोधी कक्ष, महिला सहाय्य कक्ष कार्यरत आहेत. पोलीस उपायुक्त (अंमलबजावणी) डॉ. राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली या कक्षाचे कामकाज सुरू आहे. ४५ जणांचे पथक येथे कार्यरत आहेत. लॉकडाऊन काळात पती-पत्नीच्या वादाची प्रकरणे वाढली आहेत. पोलीस उपायुक्त डॉ. राजू भुजबळ यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षभरात ३६५ तक्रार अर्ज आले. तर यावर्षी मे महिन्यापर्यंत १७८ तक्रार अर्जांची भर पडली. यापैकी एकूण ९८ जणांचा संसार वाचविण्यात पथकाला यश आले तर उर्वरित प्रकरणे संबंधित पोलीस ठाण्यात पुढील कारवाईसाठी पाठविण्यात आली आहेत.

* आकडेवारी

वर्ष तक्रार अर्ज तडजोड कारवाईसाठी शिल्लक

२०१९ - ४७६ ८९ ३८६ ०१

२०२० - ३६५ ७४ २८१ ००

२०२१ - १७८ २४ १२१ ३३

.....

* अशी आहेत कारणे...

आर्थिक परिस्थिती, मानसिक त्रासासोबतच विवाहबाह्य अनैतिक संबंध, एकत्र कुटुंब पद्धत, सासरच्या मंडळींकडून छळ, हुंड्याची मागणी ही संसार माेडण्यामागची प्रमुख कारणे दिसून येत आहेत. कोरोना काळात शुल्लक वादही घटस्फोटापर्यंत पोहोचत आहे.

* तडजोडीनंतरही पथकाचे लक्ष

एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, महिलेची पती संदर्भातील लेखी तक्रार येताच, सर्वात आधी तिची बाजू, परिस्थिती समजून घेतली जाते. पुढे पती-पत्नीची बाजू ऐकून समजून घेतो. दोघांना विश्वासात घेऊन त्यांना कुटुंब जबाबदारी, मुले, सामजिक भान यांची माहिती करुन त्यांचे समुपदेशन करण्यात येते. दोघांमध्ये तडजोड पथक महिलेची चौकशी करून सगळे योग्य सुरु आहे का नाही, याची विचारपूस करत असते. तर ज्या प्रकरणांत समुपदेशन करूनही दोघांनाही एकत्र राहायचे नसेल तर अशावेळी पुढील कारवाईसाठी अशी प्रकरणे संबंधितांकडे पाठवली जातात. याचवेळी गंभीर प्रकरणांत खातरजमा करत तत्काळ गुन्हा दाखल करण्यासाठी पाठविण्यात येते.

..........................................................

Web Title: During the Corona period, the lives of 98 people were saved due to the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.