रिक्षा, टॅक्सीच्या माध्यमातून दिली अत्यावश्यक सेवा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रसरकारने २४ मार्च २०२० रोजी देशव्यापी लॉकडाऊन घोषित केला. ट्रेन, बस बंद असल्याने लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलेल्या नागरिकांना मूळ गावी परतण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र या काळात महिलांनी सारथी होऊन रिक्षा आणि टॅक्सीच्या माध्यमातून सेवा दिली.
मुलंड येथील विद्या शेळके त्यांच्या पती व दोन मुलांसह मुलुंड येथे राहतात. विद्या यांनी पतीला घर चालविण्यासाठी मदत म्हणून रिक्षा चालविण्याचा निर्णय घेतला. काही वर्षांनंतर एका खासगी टॅक्सीसेवा देणाऱ्या कंपनीत रुजू झाल्या. मात्र, करोना संकटात त्यांची नोकरी गेली आणि पुढे काय? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला. न डगमगता त्या पुन्हा उभ्या राहिल्या व त्यांनी स्वतःची टॅक्सीसेवा सुरू केली. या टॅक्सीच्या माध्यमातून आतापर्यंत काेराेना काळात मुंबईत अडकलेल्या गरजूंना त्यांनी त्यांच्या मुळ गावी पोहोचवले आहे.
काेराेनाचा फटका स्मिता झगडे यांनाही बसला. त्या चिंचपोकळी येथील शोरूममध्ये काम करत होत्या. परंतु लॉकडाऊनमध्ये शोरूम बंद झाले. कर्मचाऱ्यांना पर्यायी नोकरी शोधण्यास सांगण्यात आले. नोकरी गेल्याने पैशांची चणचण भासू लागली. त्यावेळी टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. एका राजकीय पक्षाने २०१२ मध्ये महिलांना टॅक्सी चालवण्याचे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले हाेते. तेव्हा त्यांनी प्रशिक्षण घेतले होते. बॅच आणि परवानाही मिळाला होता. याचा त्यांना फायदा झाला. त्यांनी अत्यावश्यक सेवेसाठी टॅक्सी सुरू ठेवली आणि अनेक जणांना रुग्णालयात ये-जा करण्यासाठी सेवा उपलब्ध करून दिली.
* माणसातील माणुसकी महत्त्वाची !
घाटकोपर येथील महिला रिक्षाचालक शीतल सरवदे यांनी काेराेना काळात गरजूंना मोफत रिक्षासेवा दिली. प्रवाशांना इच्छितस्थळी पोहोचविले. शीतल सरवदे म्हणाल्या की, मी रिक्षाचालक आहे. लॉकडाऊन काळात अडचणीत असलेल्या लोकांना मदत केली. रिक्षा चालवण्याव्यतिरिक्त मी एका ठिकाणी केअरटेकरचेही काम करते. तेथे मला प्रवास खर्च मिळत होता. त्याचा वापर मी रिक्षाच्या गॅससाठी केला आणि अत्यावश्यक सेवेअंतर्गत गरजूंना मोफत सेवा दिली. काही गरजूंना एका ठिकाणाहून अन्नवाटप करत होते त्या ठिकाणी नेले. शेवटी संकटकाळ कितीही माेठा असला तरी सामाजिक बांधिलकी जपली तर सर्वांनाच मदत हाेते आणि माणसातील हीच माणुसकी सर्वश्रेष्ठ आहे, असा आदर्श शीतल यांनी त्यांच्या कार्यातून समाजासमाेर ठेवला.
.....................