लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यात दिवसभरात १० हजार ३६२ रुग्णांनी कोरोनाला यशस्वीपणे हरविले आहे. आतापर्यंत १८ लाख ४७ हजार ३६१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. नव्या वर्षांत दैनंदिन रुग्ण बरे होण्याचा हा उच्चांक आहे, याखेरीज सकारात्मक बाब म्हणजे उपचाराधीन रुग्णांची संख्या ५० हजारांच्या खाली आहे. तर सध्या राज्यातील मृत्युदर २.५५ टक्के आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात सोमवारी २ हजार ७६५ रुग्ण आणि २९ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात कोरोनाच्या तीव्र संक्रमण काळानंतर पहिल्यांदाच दैनंदिन मृत्यूंत मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. परिणामी, कोरोनाबाधितांची एकूण संख्या १९ लाख ४७ हजार ११ झाली असून मृतांचा एकूण आकडा ४९ हजार ६९५ झाला आहे. दिवसभरात नोंद झालेल्या २९ मृत्यूंपैकी ११ मृत्यू हे मागील ४८ तासांतील, तर ४ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १४ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत. या २९ मृत्यूंमध्ये मुंबई ३, ठाणे २, ठाणे मनपा १, नवी मुंबई मनपा ३, नाशिक ७, नाशिक मनपा ३, पुणे १, पुणे मनपा १, सोलापूर २, सोलापूर मनपा १, अमरावती मनपा १, नागपूर १, नागपूर मनपा ३ आदी रुग्णांचा समावेश आहे.
सध्या राज्यात २ लाख ४१ हजार ७२८ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून ३ हजार ७८ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ३० लाख ४ हजार ८७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १४.९७ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सक्रिय रुग्णांत घट
दिनांकसक्रिय रुग्ण
३० डिसेंबर ५३ हजार ६६
३१ डिसेंबर ५२ हजार ९०२
०१ जानेवारी ५२ हजार ८४
०२ जानेवारी ५३ हजार १३७
०३ जानेवारी ५४ हजार ३१७
०४ जानेवारी ४८ हजार ८०१