मुंबई - राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांची एकूण संख्या 54 हजार 758 एवढी झाली आहे. राज्यात आज 2091 नविन रुग्ण आढळून आले आहेत. तर, 1168 कोरोनाबाधित रुग्णांना सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 16,954 रुग्ण होऊन रुग्णालयातून घरी परतले आहेत. सध्या राज्यात 36,004 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. टोपे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन याबाबत माहिती दिली.
राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन या आकडेवारीबद्दल माहिती देताना, रुग्णालयातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांच्या संख्येवर भर दिला. तसेच, केंद्र सरकारच्या पथकाने दिलेल्या अंदाजानुसार, आपण परिस्थिती मोठ्या प्रमाणात आटोक्यात आणल्याचेही ठाकरेंनी सांगितले. तसेच, क्वारंटाईन सेंटर आणि कोविड रुग्णालयाच्या वाढीसाठी सरकार प्रयत्नशील असून जास्तीत जास्त रुग्णांची सोय करण्याचं नियोजन आहे, असेही त्यांनी सांगितले.
राज्य सरकारकडून प्रयत्न सुरु असतानाच, दुसरीकडे रुग्णाच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. आज दिवसभरा 2091 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे, राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 54 हजारांवर पोहोचली आहे. मात्र, सध्या रुग्णालयात दाखल असलेले, उपचार घेणारे एक्टीव्ह रुग्ण हे 36,004 एवढेच आहेत.
दरम्या, राज्य सरकारच्या आदेशानुसार खासगी रूग्णालयांना ८० टक्के बेड राखीव ठेवावेच लागतील. उपचारांच्या खर्चासह खासगी रूग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनातील तुटीची भरपाई सरकारने देण्याचा प्रश्नच येत नाही. कोरोना रुग्णांच्या उपचाराचा भार सरकारी रुग्णालयांवर आहे. अनेक खासगी रुग्णालये एकीकडे वैद्यकीय कर्मचाऱ्यांची कमतरता सांगतात आणि दुसरीकडे त्यांच्या वेतनातील तुटीची भरपाई मागतात, हा विरोधाभास आहे. अत्यावश्यक सेवा नियंत्रण कायद्यानुसार उपलब्ध खाटांसाठी कर्मचारी वर्ग रुग्णालयांनी पुरविणे बंधनकारक आहे, असे स्पष्ट मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मांडले.