लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईकरांचा प्रवास सुखकर, विनासायास व्हावा, यासाठी ‘एमएमआरडीए’ने मुंबई शहर, उपनगरात मेट्रोचे जाळे उभारण्याचा निर्णय घेतला आहे; मात्र प्रवासी सेवा पुरवणाऱ्या मेट्रो मार्गिकांना मुंबईकरांचा अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे उघडकीस आले आहे. दिवाळी सणात मोठा गाजावाजा करीत मेट्रोच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या; परंतु प्रवाशांनी त्याकडे पाठ फिरवली असून मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या मार्गिकेवरून गेल्या पंधरवड्यात केवळ ३६ लाख ३० हजार प्रवाशांनीच प्रवास केला. गेल्या महिन्याच्या तुलनेत ही संख्या निम्म्याहून कमी असल्याने भविष्यात मेट्रोचे प्रकल्पापुढे अडचणी आहेत.
मेट्रोच्या फेऱ्या दिवाळीत वाढविल्या; पण ...दिवाळीच्या सणात लोक एकमेकांना भेट देण्यासाठी बाहेर पडतात. त्यामुळे लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी ११ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत मेट्रो फेऱ्यांची संख्या रात्री १० ऐवजी रात्री १२ पर्यंत वाढवावी, अशी मागणी मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ‘एमएमआरडीए’कडे केली होती. त्यानुसार मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली; मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. या गाड्यांमधून मोजक्याच प्रवाशांनी प्रवास केला, तर उशिरा धावणाऱ्या गाड्या या रिकाम्या धावल्या असे एका कर्मचाऱ्याने सांगितले.
प्रवाशांची पाठ का? मेट्रोतून मुंबईकरांचा सुखकर प्रवास होत असला, तरी प्रवाशांना मात्र मेट्रोचा महागडा प्रवास परवडत नाही. पहिल्या ३ किमी प्रवासासाठी १० रुपये, तर १८ ते २४ किमी मार्गासाठी ४० रुपये आकारले जातात; मात्र रेल्वे आणि बेस्ट बसच्या तुलनेत हा प्रवास फारच महाग आहे
मुंबईकरांना वाहतुकीचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी ‘एमएमआरडीए’कडून मेट्रोचे जाळे विणले जात आहे. ‘एमएमआरडीए’कडून मेट्रो २ अ (दहिसर ते डी.एन.नगर) आणि मेट्रो ७ (अंधेरी ते दहिसर) ही पश्चिम उपनगरातील मार्गिका प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.तर मेट्रो १ (घाटकोपर ते वर्सोवा) ही पूर्व-पश्चिम उपनगरांना जोडणारी मेट्रो गेली काही वर्षे सेवा पुरवीत आहे. त्यापैकी या दोन्ही मेट्रो मार्गिका सुरू झाल्यापासून हळूहळू प्रवासी संख्या वाढत आहे; मात्र या दोन्ही मार्गांवर म्हणावी तशी प्रवासी संख्या अद्याप वाढलेली नाही.
दर महिन्याला मेट्रोच्या प्रवाशांमध्ये ५ टक्के वाढ होत आहे, असे मेट्रोचे म्हणणे आहे; मात्र तसे चित्र दिसून येत नाही. मेट्रोतून दररोज सुमारे अडीच लाख प्रवासी प्रवास करतात. शनिवार, रविवारी ही संख्या दीड लाख इतकी असते.
भविष्यात संख्या वाढेल‘एमएमआरडीए’कडून मेट्रोचे इतर भागांतील मार्ग बांधून पूर्ण झाल्यावर मुंबईकरांना मेट्रोद्वारे चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल. त्यामुळे भविष्यात प्रवासी संख्या देखील वाढेल, असा विश्वास मेट्रोच्या एका अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला.