पुरादरम्यान महापालिकेच्या ३२ हजार कामगारांनी मुंबईकरांना केली मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 03:06 AM2019-09-06T03:06:59+5:302019-09-06T03:07:06+5:30
निचरा करण्यासाठी सहा उदंचन केंद्रे कार्यरत
मुंबई : बुधवारी कोसळलेल्या संततधार पावसामुळे परिस्थितीची संभाव्य गरज लक्षात घेता, महापालिकेच्या सर्व २४ विभागांतील सुमारे ३२ हजार २०० एवढ्या संख्येने संबंधित कामगार, कर्मचारी व अधिकारी हे कर्तव्यावर उपस्थित आहेत. मिठी नदीने धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता लक्षात घेता १७०० नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते.
हिंदमाता, परळ टीटी, गांधी मार्केट, शक्कर पंचायत चौक, वडाळा, लक्ष्मी नारायण लेन, माटुंगा, वच्छराज लेन, माटुंगा (पू.), सायन कोळीवाडा, रावळी कॅम्प, हिंदू कॉलनी, किडवाई नगर कॉलनी, रफी अहमद किडवाई मार्ग, वडाळा, सरदार हॉटेल, काळाचौकी, दादर प्लाझासमोर, जे. के. सावंत मार्ग, नेहरूनगर ब्रिज, विद्याविहार रोड, कोहिनूर मॉल, महाराष्ट्र नगर, फ्री वे, पांजरपोळ टनेल, घाटकोपर, जवाहर नगर, आदर्श नगर, एमएचबी कॉलनी, वांद्रे बस डेपो येथील सखल भागांत पावसाचे पाणी साचले होते. येथील पाण्याचा उपसा करण्यासाठी उदंचन संच व कामगार कार्यरत होते. पूर्व आणि पश्चिम उपनगरात सखल भागात पावसाचे पाणी साचत असतानाच वांद्रे येथील कलानगरमध्येही मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. येथील परिसराला जणूकाही तळ्याचे स्वरूप आले होते.
परिणामी, येथील पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेने येथे उपसा पंप लावले.
निचरा करण्यासाठी सहा उदंचन केंद्रे कार्यरत
पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक वेगाने व्हावा, यासाठी महापालिकेच्या सर्व सहा उदंचन केंद्रांमधील पंप आवश्यक तेवढ्या संख्येने चालू करण्यात आले होते. प्रत्येक उदंचन केंद्रात तेथील आवश्यकतेनुसार सहा ते दहा एवढ्या संख्येने पंप असून या प्रत्येक पंपाची क्षमता ही दर सेकंदाला तब्बल ६ हजार ६०० लीटर पाण्याचा उपसा करण्याची आहे. सर्व सहा उदंचन केंद्रांमध्ये एकूण ४३ पंप असून त्या त्या भागातील पावसाचे प्रमाण लक्षात घेता त्यापैकी २४ पंप सुरू केले होते़
हाजी अली पम्पिंग स्टेशन येथील सहापैकी तीन पंप चालू करण्यात आले होते.
वरळी गाव येथील क्लीव्ह लॅण्ड बंदर पम्पिंग स्टेशन येथील सातपैकी चार पंप चालू करण्यात आले होते.
वरळी नाका येथील लव्ह ग्रोव्ह पम्पिंग स्टेशन येथील दहापैकी चार पंप सुरू करण्यात आले होते.
रे रोड परिसरातील ब्रिटानिया पम्पिंग स्टेशन येथील सहापैकी चार पंप सुरू करण्यात आले होते.
सांताक्रुझमधील गजधरबंध पम्पिंग येथील सहापैकी चार पंप सुरू करण्यात आले होते.
जुहूमध्ये ईर्ला पम्पिंग स्टेशन येथील आठपैकी पाच पंपांद्वारे पाण्याचा अधिक वेगाने उपसा सुरू केला़