गणेशोत्सवाच्या काळात मुंबईतले ७४ रस्ते वाहतूकीसाठी बंद, ११४ ठिकाणी नो पार्किंग झोन
By मनीषा म्हात्रे | Published: August 23, 2022 09:07 PM2022-08-23T21:07:49+5:302022-08-23T21:08:12+5:30
गणेशोत्सव काळात शहरातील वाहतुक सुरळीत ठेवत प्रवाशांची गैरसोय टाळण्याचे एक मोठे आव्हान मुंबई वाहतूक पोलीसांसमोर असते.
मुंबई : मुंबईत मोठ्या उत्साहात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाच्या काळात वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांकडून वाहतूकीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार, मुंबईतले ७४ रस्ते वाहतूकीसाठी बंद करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुंबई पोलिसांनी घेतला आहे. तसेच, ५४ रस्ते एक दिशा मार्ग करण्यात आलेले आहेत. तर, ५७ रस्त्यांवर मालवाहू अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला असून ११४ ठिकाणी नो पार्किंग म्हणून घोषित करण्यात आले आहे. वाहतूक शाखेच्या उपायुक्त तथा प्राचार्य़ प्रज्ञा जेडगे यांनी याबाबतचे आदेशपत्र जारी केले आहे.
गणेशाच्या आगमन मिरवणूकांसोबतच गणेशोत्सव काळात दर्शनासाठी लांंबच लांब रांगा लागतात. तसेच विसर्जन मिरवणूकीतही नागरीक मोठ्या प्रमाणात सहभागी होता. त्यामुळे शहरातील वाहतुक सुरळीत ठेवत प्रवाशांची गैरसोय टाळण्याचे एक मोठे आव्हान मुंबई वाहतूक पोलीसांसमोर असते. याच पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी शहरातील ७४ रस्ते वाहतूकीसाठी बंद ठेवण्यासोबतच ५४ रस्ते एक दिशा मार्ग करण्यात आलेले आहेत. तर, ५७ रस्त्यांवर मालवाहू अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला असून ११४ ठिकाणी नो पार्किंग घोषित करण्यात आले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात दुपारी बारा वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी पहाटे सहा वाजेपर्यंत वाहतूक पोलिसांनी लागू केलेल्या अधिसुचना अंमलात रहाणार आहेत. तसेच, गणेश विसर्जनावेळी आवश्यक त्या मार्गावर सदर वाहतुक नियमनाबाबतची अधिसुचना लागू करण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाने स्पष्ट केले आहे. वाहतुक पोलिसांकडून जारी करण्यात आलेल्या निर्बंधांचे पालन करून गणेशोत्सव शांततेने व आनंदाने पार पाडण्यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
विशेष नियंत्रण कक्ष आणि १० हजार पोलिसांचा फौजफाटा
गिरगाव चौपाटी, शिवाजी पार्क चौपाटी, जुहू चौपाटी, मालाड मालवणी टी जंक्शन आणि गणेश घाट पवई या महत्वाच्या विसर्जन ठिकाणी वाहतुक पोलीसांची विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. गणेश विसर्जनाच्या दरम्यान वाहतुकीचे नियमन व नियंत्रण करण्यासाठी महत्वाच्या ठिकाणी निरिक्षण मनोरे देखील उभे करण्यात येत आहेत. तसेच, गणेश विसर्जन मिरवणूकीवेळी वाहने बंद पडून विसर्जनाच्या मार्गात होणारा अडथळा दूर करण्यासाठी महत्वाच्या ठिकाणी पोलीस आणि मुंबई महानगरपालिकेकडून लहान आणि मोठ्या क्रेनची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
गणेश भक्तांना वैदयकीय सुविधा मिळण्यासाठी प्राथमिक उपचार केंद्रे देखील उभारण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या काळात वाहतुकीचे नियमन करण्यासाठी १० हजार ६४४ पोलीस अधिकारी आणि अंमलदारांसोबतच गृहरक्षक दल, ट्राफीक वाॅर्डन, नागरी संरक्षण दल, एन.एस.एस., आर. एस. पी. तैनात करण्यात आले आहेत. वाहतुक पोलीसांना मदत करण्याकरीता वेगवेगळ्या स्वयंसेवी संघटनासूद्धा सज्ज राहणार आहेत.