सिडको घोटाळ्याच्या चौकशीत दिरंगाई - काँग्रेस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 06:10 AM2019-03-06T06:10:20+5:302019-03-06T06:10:28+5:30
प्रकल्पग्रस्तांसाठी संपादित करण्यात आलेली नवी मुंबई येथील जमीन नाममात्र दरात बिल्डरला देण्यात आली.
मुंबई : प्रकल्पग्रस्तांसाठी संपादित करण्यात आलेली नवी मुंबई येथील जमीन नाममात्र दरात बिल्डरला देण्यात आली. या प्रकरणाची तीन महिन्यात चौकशी करून अहवाल देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र, आठ महिने उलटूनही चौकशीलाच सुरूवात झाली नाही. या चौकशीला मुद्दाम विलंब केला जात असल्याचा आरोप, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी मंगळवारी केला.
आझाद मैदान येथील काँग्रेस कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत निरूपम म्हणाले की, कोयना प्रकल्पग्रस्तांसाठी संपादित केलेली २४ एकर जमीन नाममात्र दरात पॅराडाइज् बिल्डरला विकण्यात आली. १७०० कोटींची जमीन अवघ्या साडेतीन कोटीत पॅराडाईज बिल्डरला विकली. याबाबतची सर्व पुरावे काँग्रेसने सादर केले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी येथील जमीन व्यवहाराला स्थगिती दिली. न्यायालयीन समितीकडून तीन महिन्यांत चौकशी करण्याचे आश्वासन विधिमंडळात दिले. त्या घोषणेला आठ महिने उलटले तरी चौकशीच सुरू केली नाही, असे निरूपम म्हणाले.
ही जमीन अद्याप संबंधित बिल्डरांकडेच आहे. भाजपा सरकार पॅराडाईज बिल्डरचे मनीषा भतीजा, संजय भालेराव यांना पाठीशी घालत आहे. मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात चौकशीचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे चौकशी कुठवर आली, पुढील तीन महिन्यांत तरी चौकशी पूर्ण होईल का, याची त्यांनी द्यावीत, अशी मागणी निरूपम यांनी केली.