Join us

लाॅकडाऊनच्या काळात १ लाख ६७ हजार तरुणांना मिळवून दिला रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 4:06 AM

नवाब मलिक : कौशल्य विकास विभागामार्फत रोजगाराची मोहीम सुरूच ठेवणारलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू ...

नवाब मलिक : कौशल्य विकास विभागामार्फत रोजगाराची मोहीम सुरूच ठेवणार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लाॅकडाऊनच्या काळात १ लाख ६७ हजार ७१ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात कौशल्य विकास विभागाने महत्त्वाची भूमिका बजावल्याची माहिती कौशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. तर, २०२० या संपूर्ण एका वर्षाच्या कालावधीत १ लाख ९९ हजार ४८६ बेरोजगारांना रोजगार मिळवून दिल्याचे त्यांनी सांगितले.

कोरोना काळातील बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये ऑनलाइन रोजगार मेळावे तसेच महास्वयंम वेबपोर्टलमार्फत विविध उपक्रम राबविण्यात आले. याद्वारे राज्यात एकट्या डिसेंबर महिन्यात ३४ हजार ७६३ बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. तर, एकूण लॉकडाऊनच्या काळात डिसेंबरअखेरपर्यंत १ लाख ६७ हजार ७१ बेरोजगारांना रोजगार मिळाला. यामध्ये मुंबई विभागात ९०२, नाशिक विभागात १४ हजार ९२०, पुणे विभागात ६ हजार ८२६, औरंगाबाद विभागात ८ हजार १४५, अमरावती विभागात ३ हजार ९२८, तर नागपूर विभागात ४२ इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.

बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरू केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहितीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करून त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. अशा प्रकारे बेरोजगार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येते, असे मलिक यांनी सांगितले.

राज्यात सर्व जिल्ह्यांमध्ये १२ ते २० डिसेंबर २०२० दरम्यान ऑनलाइन महारोजगार मेळावे घेण्यात आले. यामध्ये राज्याच्या विविध भागांतून ४९७ उद्योगांनी त्यांच्याकडील ८६ हजार ४३५ रिक्तपदे या मेळाव्यातून भरण्यासाठी खुली केली. या पदांसाठी १ लाख ६० हजार ८२७ बेरोजगार उमेदवारांनी अर्ज केले. त्यापैकी ५ हजार २८१ उमेदवारांना आतापर्यंत विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली असून, उर्वरिक्त रिक्त पदांची भरतीप्रक्रिया सुरू असल्याची माहिती मलिक यांनी दिली. ही प्रक्रिया आगामी काळातही सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

......................