लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना शौचालयासाठी मोजावे लागतात पैसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2020 06:48 PM2020-04-07T18:48:11+5:302020-04-07T18:48:58+5:30

शौचालयाची सुविधा मोफत करण्याची अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेची मागणी...

During lockdown, citizens have to pay for toilets | लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना शौचालयासाठी मोजावे लागतात पैसे

लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना शौचालयासाठी मोजावे लागतात पैसे

Next

मुंबई :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाउन घोषित करण्यात आले आहे. या परिस्थितीचा गरीब वंचित कुटुंबांच्या जीवनमानावर परिणाम होऊ नये म्हणून सरकार, विविध संस्था संघटना पुढे उपाययोजना करत आहेत. असे असताना मुंबईत अनेक ठिकाणी रहिवाशांना प्रतिदिन दोन ते तीन रुपये मोजावे लागत आहे. नागरिकांना शौचालयाची सुविधा मोफत करावी अशी मागणी अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने केली.

याबाबत अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या मुंबई जिल्हा अध्यक्षा रेखा देशपांडे म्हणाल्या की, गोवंडी साठेनगर येथील रहिवाश्यांना शौचालय वापरण्यासाठी देखील पैसे मोजावे लागत आहेत. साठेनगर येथील जुने शौचालय चालू नसल्याने गेला काही काळ लल्लुभाई कंपाऊंड समोरील एक व दुसरे मांगीरबाबा मंदिरा जवळील शौचालय सध्या रहिवासी वापरत आहेत.  परंतू येथे जाण्यासाठी प्रतिव्यक्ती प्रतिदिन दोन किंवा तीन रुपये खर्च त्यांना करावा लागत आहे. म्हणजे एका कुटुंबात ५ व्यक्ती धरल्या तर दर दिवशी दहा ते पंधरा रुपये इतका खर्च त्यांना करावा लागत आहे. अशीच परिस्थिती मुंबईत अनेक ठिकाणी आहे. जे खाजगी संस्थाकडे दिले आहेत ते गरीबांकडून पैसे घेत आहेत.याबाबत प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत पण योग्य ती कारवाई होताना दिसत नाही.  येथील बहुतेक लोक हातावर पोट असणारे, असंघटीत क्षेत्रात काम करणारे आहेत हे लक्षात घेता शौचालया सारख्या अत्यावश्यक बाबीसाठी इतका पैसा मोजणे त्यांच्यावर आणखी बोजा वाढविणारे आहे त्यामुळेच येथील रहिवाश्यांना मोफत शौचालय वापरण्याची सोय करणे अत्यावश्यक आहे.

शौचालय देखभालीसाठी खाजगी संस्था नको
शौचालयाच्या देखभालीसाठी पालिकेने खाजगी संस्थांना जबाबदारी दिली आहे.या संस्था देखभालीसाठी माणसांची नेमणूक करतात. त्यामुळे त्यांचा खर्च वाढतो. तो खर्च वसूल करण्यासाठी रहिवाशांना पैसे आकारतात. पण त्याऐवजी महापालिकेने देखभाल केली तर खर्च वाचेल आणि रहिवाशांना मोफत शौचालयाची सुविधा मिळेल असे रेखा देशपांडे  म्हणाल्या.

Web Title: During lockdown, citizens have to pay for toilets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.