मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू झालेल्या लॉकडाउनच्या काळातही डिजिटल प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर करून विविध विकासकांच्या प्रकल्पांतील २४० घरे आणि ६२ व्यावसायिक जागांचे सुमारे २५२ कोटी रुपये किंमतीचे खरेदी-विक्री व्यवहार यशस्वीरीत्या पूर्ण केल्याची महिती अॅनरॉक ग्रुपच्यावतीने देण्यात आली आहे. यापैकी ८५ कोटी रुपये किंमतीचे ११७ व्यवहार (४९ टक्के) कोरोनाचा सर्वाधिक प्रसार असलेल्या एमएमआर क्षेत्रातले आहेत.लॉकडाउनमुळे बांधकाम प्रकल्पांच्या साईट व्हिजीट २५ मार्चपासून बंद झाल्या आहेत. त्यानंतरही डिजिटल सेलच्या माध्यमातून २१४ कोटी ६० लाख रुपये किंमतीची २४० घरे आणि ३७ कोटी रुपये किंमतीच्या व्यावसायिक जागा विकण्यात अॅनरॉकला यश आले आहे. विक्री झालेल्या घरांची किंंमत ही ७० लाख आणि दीड कोटी रुपयांच्या दरम्यानची आहे. तर, कार्यालयीन जागा ६० लाख रुपये किंमतीच्या आसपास आहेत.लॉकडाउननंतरच्या पहिल्या दहा दिवसांत काम जवळपास बंद झाले होते. मात्र, त्यानंतर जे खरेदी-विक्री व्यवहार अंतिम टप्प्यात होते आणि जिथे चर्चा सुरू होती त्यापैकी काही व्यवहार आम्ही यशस्वीरीत्या पूर्ण केल्याची माहिती अॅनरॉकचे अध्यक्ष अनुज पुरी यांनी दिली. नामांकित विकासकांसोबतची भागीदारी आणि खरेदीदारांना दिलेल्या सवलती हे या यशाचे गमक असल्याचेही त्यांनी नमूद केले. सध्याच्या काळात डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून खरेदी-विक्रीचे व्यवहार प्रभावी पद्धतीने करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी इंटिग्रेटेड डिजिटल सेल्स सोल्युशन (आयडीएसएस) हा डिजिटल प्लॅटफॉर्मही तयार केला आहे. आम्ही दररोज पाच ते सहा ठिकाणच्या ऑनलाइन साईट व्हिजीट घडवून आणतो. त्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.संभाव्य ग्राहकांना संपर्क सुरूलॉकडाउन जाहीर झाल्यानंतर प्रकल्पांच्या जाहिराती, ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठीचे फोन कॉल आणि मेसेज बंद झाले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून ते पुन्हा सुरू झाले आहेत. तूर्त नव्या ग्राहकांचा शोध आमच्यासाठी अवघड आहे. मात्र, यापूर्वी प्रकल्पांना भेट दिलेल्या संभाव्य ग्राहकांना आम्ही संपर्क साधण्याचे प्रयत्न करतोय. गृहखरेदीला चालना देण्यासाठी काही विकासकांनी आॅफर्सही तयार केल्या आहेत. तसेच, बहुतांश विकासकांचे डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करण्याचे कामही सुरू असल्याची माहिती वेगवेगळ्या विकासकांना घरांच्या खरेदी-विक्रीसाठी सहकार्य करणारे चॅनल पार्टनर नितीन कुमार यांनी दिली.
लॉकडाउन असताना झाली २५२ कोटींच्या घरांची विक्री
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 2:55 AM