नवीन वर्षात हार्बर, ट्रान्स हार्बरवर वाढीव २५ फेऱ्या
By admin | Published: December 10, 2015 02:30 AM2015-12-10T02:30:32+5:302015-12-10T02:30:32+5:30
नवीन वर्षात हार्बर, ट्रान्स हार्बरवासियांना २५ वाढीव फेऱ्या मिळणार असल्याचे मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. फेब्रुवारी अगोदर या फेऱ्या मिळतील.
मुंबई : नवीन वर्षात हार्बर, ट्रान्स हार्बरवासियांना २५ वाढीव फेऱ्या मिळणार असल्याचे मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. फेब्रुवारी अगोदर या फेऱ्या मिळतील. मात्र, लोकलअभावी मेन लाइनवर वाढीव फेऱ्या मिळण्यात अडथळा निर्माण झाला आहे.
मध्य रेल्वेच्या हार्बर आणि ट्रान्स हार्बरवासियांना सध्या गर्दीचा सामना करावा लागत आहे. मध्य रेल्वेच्या मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवर अनेक सुविधांचा वर्षाव होत असतानाच, हार्बर आणि ट्रान्स हार्बरवासियांना मात्र, कोणत्याही सुविधा मिळत नसल्याने प्रवाशांकडून रोष व्यक्त केला जात आहे. सध्या हार्बर मार्गावर ३६ लोकलच्या ५८३ फेऱ्या होत असून, ट्रान्स हार्बरवर १0 लोकलच्या २१0 फेऱ्या होतात. यामध्ये आणखी २५ फेऱ्यांची वाढ करण्यात येणार आहे. यात ५ फेऱ्या हार्बर मार्गावर, तर २0 फेऱ्या ट्रान्स हार्बर मार्गावर होतील. हार्बर, ट्रान्स हार्बरवरील फेऱ्या वाढविण्यासाठी नव्या लोकलची भर पडणार नाही. सध्या धावत असलेल्या लोकलच्या फेऱ्यांमध्येच वाढ करण्यात येईल. मध्य रेल्वेच्या मेन लाइनवरील प्रवाशांना मात्र, पुढील वर्षी वाढीव फेऱ्या मिळणार नाहीत. मेन लाइनचा पसारा खूप मोठा असून, वाढीव फेऱ्या देण्यासाठी नव्या लोकलची गरज असल्याचे सांगितले. मेन लाइनवर सध्या ७५ लोकलच्या ८२५ फेऱ्या होत आहेत.