पनवेल-वसईदरम्यान रोज १७० लोकलचा प्रस्ताव
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 03:31 AM2019-11-18T03:31:46+5:302019-11-18T03:32:10+5:30
दोन जादा मार्गिका उभारणार : मध्य रेल्वेच्या मंजुरीनंतर योजना जाणार मंत्रिमंडळापुढे
मुंबई : पनवेल-वसई रेल्वेमार्गाचे चौपदरीकरण करून त्यावरून भविष्यात लोकलच्या दररोज १७० फेऱ्या चालवण्याचा आराखडा मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाने (एमआरव्हीसी) तयार केला आहे. त्यासाठी रेल्वे रुळांच्या उभारणीसाठी अंतिम जागा निवडीसाठीचा प्रस्ताव मध्य रेल्वेकडे पाठविण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाली की हा प्रकल्प मार्गी लागण्याची शक्यता आहे.
मध्य रेल्वेचा हार्बर आणि मुख्य मार्ग, तसेच पश्चिम रेल्वे यांना जोडणारा हा मार्ग आहे. तोच पुढे कोकण रेल्वेला जोडला जातो. त्यामुळे या मार्गाच्या चौपदरीकरणाची मागणी २०१२ पासून सुरू असल्याने मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या (एमआरव्हीसी) चार अ टप्प्यात त्याचा समावेश झाला.
पनवेल ते वसई या ६३ किमी मार्गाच्या चौपदरीकरणावर सात हजार ८७२ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गावर आणखी ११ स्थानके बांधण्याचा प्रस्ताव असल्याने त्यावरील स्थानकांची संख्या २४ होईल. सध्या या मार्गावरून मेमू गाड्या धावतात आणि प्रवासाला एक तास १९ मिनिटे लागतात. लोकल सुरू झाली की हा वेळ आणखी कमी होईल. चौपदरीकरणानंतर या मार्गावरून लोकलच्या दररोज १७० फेºया चालवण्याचे नियोजन आहे. त्यासाठी तब्बल ९८० कोटींचा आराखडा एमआरव्हीसीने तयार केला आहे. त्यात नवीन रेल्वे स्थानके, फलाटांची उंची वाढविणे, सिग्नल यंत्रणेतील बदलांचा समावेश आहे. सध्या पनवेल ते पेणदरम्यान मेमू धावतात. त्याऐवजी अलिबागपर्यंत लोकल नेण्याचा प्रस्ताव आहे. विरार- डहाणू मार्गाच्या चौपदरीकरणानंतर येथील लोकल थेट डहाणूपर्यंत नेण्याचे नियोजन आहे.
भूसंपादन ठरणार कळीचा मुद्दा
सध्याच्या पनवेल-वसई मार्गाचे चौपदरीकरण करण्याचा प्रस्ताव आहे. त्यासाठी भूसंपादन करावे लागेल. याच मार्गाशेजारून मुंबई (जेएनपीटी-उरण) ते दिल्लीदरम्यान मालवाहतुकीचा जलद मार्ग (डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर) जाणार आहे. त्याचेही भूसंपादन सुरू आहे. विरार-डहाणू पट्ट्यातही चौपदरीकरणाबरोबर मालवाहतुकीच्या मार्गाचे भूसंपादन सुरू आहे. या पट्ट्यात असलेल्या नागरी वस्त्यांच्या परिसरात इमारती हटवून रेल्वेमार्गांच्या विस्ताराचे मोठे आव्हान आहे.