यंदाच्या पावसाळ्यात २८ मोठ्या भरतीचे तर नीप टाईडचे १२ दिवस
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 02:15 AM2019-05-03T02:15:13+5:302019-05-03T02:16:45+5:30
महापालिका : मुसळधार पावसासह ‘नीप टाईड’चे दिवसही धोकादायक
मुंबई : मोठ्या भरतीच्या दिवशी मुसळधार पाऊस कोसळल्यास मुंबईची तुंबापुरी होते. हेच नव्हेतर, ‘नीप टाईड’चे दिवसही मुंबईसाठी धोकादायक ठरू लागले आहेत. या वर्षी पावसाळ्यात २८ दिवस मोठ्या भरतीचे तर १२ दिवस नीप टाईडचे असणार आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.
मुंबईतील पर्जन्य जलवाहिन्या ताशी सुमारे ५० मीमी पावसाचे पाणी वाहून नेत आहेत. मात्र मोठ्या भरतीच्या दिवशी समुद्रात ४.५ मीटर उंचीच्या लाटा उसळतात. अशा वेळी मुसळधार पाऊस कोसळल्यास मुंबईतील सकल भागांमध्ये पाणी तुंबते. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी अशा मोठ्या भरतीच्या दिवसांची यादी तयार करून त्या दिवशी महापालिका किनारपट्टीवर विशेष काळजी घेते.
दोन वर्षांपूर्वी नीप टाईडच्या दिवशी मोठा पाऊस होऊन मुंबईची तुंबापुरी झाली होती. त्या अनुभवानंतर मोठ्या भरतीच्या दिवसांबरोबरच
नीप टाईडच्या दिवसांचीही यादी
पालिकेने तयार करण्यास सुरुवात केली. या दोन्ही भरतीच्या याद्या वाहतूक पोलीस, अग्निशमन दल आणि अन्य प्राधिकरणांना महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने पाठविल्या आहेत. जेणेकरून अशा भरतीच्या दिवशीही मुंबईकर आणि संबंधित यंत्रणा सतर्क राहतील, ज्यामुळे जीवित व वित्तहानी टाळणे शक्य होईल.
मोठ्या भरतीचे दिवस (कंसात लाटांची उंची)
जून : ३ (१२.१२ मी.), ४ (४.६४ मी.), ५ (४.६८ मी.), ६ (४.६५ मी.), ७ (४.५५ मी.), १७ (४.५१ मी.)
जुलै : २ (४.५४ मी.), ३ (४.६९ मी.), ४ (४.७८ मी.), ५ (४.७९ मी.), ६ (४.७४ मी.), ७ (४.६० मी.), ३१ (४.५३ मी.)
ऑगस्ट : १ (४.७४ मी.), २ (४.८७ मी.), ३ (४.९० मी.), ४ (४.८३ मी.), ५ (४.६५ मी.), २९ (४.५३ मी.), ३० (४.७७ मी.), ३१ (४.९० मी.)
सप्टेंबर : १ (४.९१ मी.), २ (४.६७ मी.), ३ (४.५४ मी.), २७ (४.५१ मी.) २८ (४.७२ मी.), २९ (४.६३ मी.), ३० (४.८३ मी.)
...तर मुंबईची तुंबापुरी होण्याची शक्यता
या वर्षी २८ मोठ्या भरतीचे तर १२ नीप टाईडचे दिवस आहेत. या काळात मुंबईत मुसळधार पाऊस सतत कोसळल्यास पावसाचे पाणी समुद्रात वाहून जाण्याचा मार्ग मंदावतो. यामुळे मुंबईची तुंबापुरी होण्याची शक्यता आहे.
असे आहेत नीप टाईडचे दिवस
जेव्हा मोठी भरतीही नाही आणि आहोटीही नसेल त्याला नीप टाईड असे संबोधले जाते. जून महिन्यात २५, २६, २७ तारीख, जुलैमध्ये २५, २६, २७, तर २४ आणि २५ ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात ७, ८, २२, २३ सप्टेंबर या दिवशी नीप टाईड असणार आहे.