मुंबई, दि. 19 - सांताक्रूझ-विलेपार्ले दरम्यान रेल्वे ट्रॅकवर झाड कोसळल्याने हार्बर रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अंधेरी-सीएसएमटी मार्गावर वाहतूक अर्धा तास उशिराने सुरु आहे तसेच मध्य रेल्वेची वाहतूकही 15 मिनिट उशिराने सुरु आहे. मंगळवार दुपारपासून मुंबईत पावसाने जोर पकडला आहे. सखल भागात कुठे पाणी साचल्याचे वृत्त नसले तरी, उपनगरीय रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
मुंबईत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरु आहे. खर तर सकाळपासून पावसाचं वातावरण नव्हतं. मात्र दुपारी 2 च्या सुमारास अंधारून आल्यावर येऊन पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईतील दादर, वरळी, लालबाग, वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, ठाणे, डोंबिवली भागात जोरदार पाऊस झाला. तसंच कांदिवली, बोरीवलीमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू आहे.
तसंच विलेपार्ले, सांताक्रुझ, अंधेरी, गोवंडी, चेंबूर आणि मानखुर्द परिसरात रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. साकीनाका भागातही पावसाने हजेरी लावली असून पवई, कांजूरमार्ग भागात ढगांच्या गडगडाटासह पाऊस सुरू आहे. मागच्या महिन्यात 29 ऑगस्टला मुंबईत तुफान पाऊस कोसळला होता. त्यामुळे संपूर्ण मुंबई ठप्प झाली होती. 19 जणांचा या पावसामध्ये मृत्यू झाला होता.