विश्वविजेत्या टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईकरांनी मरीन ड्राईव्हवर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाचे स्वागत करण्यासाठी, मुंबईतील मरीन ड्राइव्हवर व्हिक्ट्री परेडचे आयोजन करण्यात आले होते. या परेडमध्ये लाखो क्रिकेट चाहते जमले होते. मात्र या सेलिब्रेशनच्या नादात काही चाहत्यांना मोठा त्रास सहन करावा लागला. भारतीय क्रिकेट संघाला पाहण्यासाठी आणि खेळाडूंचे स्वागत करण्यासाठी मरीन ड्राईव्हवर जमलेल्या क्रिकेट चाहत्यांच्या गर्दीत चेंगाचेंगरीमुळे आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागले. काही क्रिकेट चाहते जखमी झाले तर काहींना श्वास घेण्यास त्रास झाला.
भारताच्या वर्ल्डकप विजयाचा जल्लोष गुरूवारी मुंबईत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मरिन ड्राईव्हवर टीम इंडियाच्या व्हिक्ट्री परेडचा आनंद मुंबईकरांनी घेतला. यानंतर भारतीय संघ वानखेडे स्टेडियमवर पोहोचला जिथे सर्व खेळाडूंना १२५ कोटी रुपयांचा धनादेश देऊन गौरविण्यात आले. मात्र त्याआधी मरीन ड्राईव्हवर काही क्रिकेट चाहते जखमी झाले तर अनेकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. जखमी चाहत्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
गुरुवारी मरीन ड्राइव्हच्या तीन किलोमीटरच्या पट्ट्यात लोकांच्या गर्दीमुळे जमीन दिसत नव्हती. मरीन ड्राईव्हच्या रस्त्यावर क्रिकेट चाहत्यांचा फक्त जनसागर दिसत होता. व्हिक्ट्री परेडनंतर भारतीय क्रिकेट संघ वानखेडे स्टेडियमवर पोहोचला तेव्हा हजारो चाहत्यांनी खेळाडूंचे जोरदार स्वागत केले. मुंबई क्रिकेट असोसिएशनने वानखेडेमध्ये क्रिकेट चाहत्यांना मोफत प्रवेश दिला होता.
व्हिक्ट्री परेडदरम्यान किमान १० जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मुंबई पोलिसांनी सांगितले की, ज्या चाहत्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले त्यांच्यापैकी अनेकांना फ्रॅक्चर झाले होते आणि इतरांना श्वास घेण्यास त्रास होत होता. जखमींना जवळच्या सरकारी जीटी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलेल्या १० पैकी ८ जणांना काही वेळाने घरी सोडण्यात आले. दोन जणांना उपचारासाठी रुग्णालयात ठेवण्यात आलं आहे.
दरम्यान, मरीन ड्राईव्हवरील गर्दीचे व्यवस्थापन केल्याबद्दल मुंबई पोलीस आयुक्तांनी गुरुवारी पोलीस अधिकाऱ्यांचे कौतुक केले. पोलीस आयुक्तांनी मुंबईतील लोकांचे त्यांच्या पाठिंब्याबद्दल आभार मानले. गर्दीत अनेक मुले पालकांपासून विभक्त झाली, मात्र मुंबई पोलिसांच्या तत्परतेमुळे ती पुन्हा त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचली असे पोलीस आयुक्तांनी म्हटलं.