Join us

राज्यात जाळपोळ अन् अशांतता असताना शासन आपल्या दारी कार्यक्रम; रोहित पवारांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2023 7:00 PM

आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. 

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावं, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र उपोषण सुरू केलं आहे. या उपोषणाला मराठा समाजातून मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळत आहे. तसेच काही ठिकाणी या आंदोलनाला हिंसक वळणही लागलं आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यावर दगडफेक आणि आवारातील वाहनांना आग लावण्याची घटना समोर आली. त्यानंतर आता बीडमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय 'राष्ट्रवादी भवन' पेटवून दिले असल्याची घटना समोर आली आहे. याचपार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. 

महाराष्ट्र आज जळत असताना आणि राज्यात अशांतता निर्माण झाली असताना, अशा परिस्थितीत ज्या गोष्टीसाठी आज लोक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरले आहेत ते त्यांना न देता सरकार इतरत्र टाईमपास करत आहे. लोकांना योजनांचा लाभ घरपोच देण्याच्या नावाखाली सरकार शासन आपल्या दारी या सरकारी कार्यक्रमाच्या माध्यमातून इमेज बिल्डिंगसाठी शासकीय तिजोरीतून पैशांची उधळपट्टी करतंय, अशी टीका रोहित पवरांनी केली. कधी कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यायला पाहीजे, हे सरकारला कळत नसेल तर या सरकारचं अवघड आहे. वाईट याचं वाटतं की, यात शेवटी नुकसान महाराष्ट्राचं होतं, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणावरून राज्यात जी काही आंदोलने व उपोषणे सुरू आहेत त्याकडे आम्ही अतिशय गांभीर्याने पाहत आहोत. सरकारला मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे, कायद्याला, नियमाला धरून आरक्षण द्यायचे आहे. त्यामुळे यासाठी सर्व बाजूंचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा लागणार आहे. समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण दिले जाईल, असे आश्वासन एकनाथ शिंदेंनी आज पुन्हा दिले. यापूर्वी दिलेले आरक्षण न्यायालयात टिकू शकले नाही, असे पुन्हा घडू नये यासाठी काळजीपूर्वक पावले टाकावी लागणार आहेत. यामुळे आंदोलकांनी देखील सरकारची भूमिका समजून घेत सहकार्य करावे. मराठा समाज बांधवांनी टोकाचे पाऊल उचलू नये. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची आम्हाला काळजी आहे. त्यांनी वैद्यकीय उपचार घ्यावेत, पाणी प्यावे. आंदोलकांनी शांततेचा मार्ग सोडू नये, असे आवाहनही एकनाथ शिंदे यांनी केले.

आत्महत्या करू नका, उद्रेक करू नका-

आपण आरक्षणासाठी आंदोलन पुकारले आहे. आत्महत्या करू नका, उद्रेक करू नका, आपण लढून मराठा आरक्षण मिळवू, अशी सादही मनोज जरांगे पाटील यांनी घातली.

टॅग्स :रोहित पवारमराठा आरक्षणमहाराष्ट्र सरकार