Join us

निवडणूक काळात पाण्याचा खडखडाट, पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रात ३५ टक्केच पाणीसाठा शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 9:23 AM

यंदा ऐन मे महिन्यातील रणरणत्या उन्हात मुंबई शहरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे.

मुंबई : यंदा ऐन मे महिन्यातील रणरणत्या उन्हात मुंबई शहरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगणार आहे. पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मुंबई शहर व उपनगरात निवडणूक होऊ घातली असतानाच याच काळात पाण्याचा खडखडाट जाणवण्याची चिन्हे आहेत. आधीच मुंबईकर महापालिकेकडून वारंवार केल्या जाणाऱ्या पाणी कपातीमुळे हैराण झाले आहेत, त्यात आताच मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रांतील पाणीसाठा ३५ टक्क्यांवर आला आहे. परिणामी, मे महिन्यात मुंबईकरांना पाणी कुठून मिळणार, अशी चिंता सतावू लागली आहे. 

अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात तलावांमधून मुंबईकरांना दररोज सुमारे ३८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. गेल्या वर्षी पावसाने ओढ दिली असली तरी जूनपर्यंत पावसाने हजेरी लावल्याने सातही तलावांमध्ये पूर्ण क्षमतेने पाणीसाठा उपलब्ध झाला होता. त्यामुळे वर्षभराची मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून तापमानात प्रचंड वाढ झाली असून, उन्हाच्या काहिलीने मुंबईकर हैराण होऊ लागले आहेत. त्याच वेळी तलावांमधील पाण्याचे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होत आहे. त्यामुळे तलावातील पाणीसाठा जलदगतीने कमी होत असल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. मागील वर्षी याच काळात सातही धरणक्षेत्रांत ४१ टक्के पाणीसाठा होता. तर २०२२ साली पाणीसाठ्याची पातळी ४४ टक्क्यांवर होती. 

तीनदा कपात -

१) २७ फेब्रुवारीला पिसे जल उदंचन केंद्रात ट्रान्सफाॅर्मरला लागलेल्या आगीमुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. तो सुरळीत करण्यासाठी पालिकेने ५ मार्चपर्यंत १५ टक्के कपात लागू केली.

२) १४ मार्चपासून भांडुप जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्यात येत असल्याने २४ एप्रिलपर्यंत ५ टक्के कपात लागू आहे.

३) पिसे येथील बंधाऱ्यातून पाणीगळती होत असल्याने १५ टक्के कपात लागू करण्यात आली आहे.

धरण                      पाणीसाठा (दशलक्ष लिटर)अप्पर वैतरणा                 १,१८,२४४मोडक सागर                  ३६,८६१तानसा                            ६८,५०९ मध्य वैतरणा                   २०,४७४ भातसा                           २,४७,०५५विहार                             १२,८७९तुळशी                           ३,९६२

अतिरिक्त पाणी मिळावे, यासाठी सरकारकडे पत्रव्यवहार केला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी २ लाख ३० हजार दशलक्ष लिटर राखीव पाणीसाठा देण्यास राज्य सरकारने होकार दिला आहे, असे पालिकेच्या जलविभागाने सांगितले.

टॅग्स :मुंबईलोकसभा निवडणूक २०२४पाणीकपात