Join us

मान्सूनच्या सलामीलाच फज्जा ! दादर, परळसह अनेक भागांत साचले गुडघाभर पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2024 9:38 AM

घामाच्या धारा व प्रचंड उकाड्याने हैराण झालेले मुंबईकर ज्याची चातकाप्रमाणे वाट पाहत होते, त्या मान्सूनची प्रतीक्षा अखेर संपली.

मुंबई : घामाच्या धारा व प्रचंड उकाड्याने हैराण झालेले मुंबईकर ज्याची चातकाप्रमाणे वाट पाहत होते, त्या मान्सूनची प्रतीक्षा अखेर संपली. रविवारी दाखल झालेल्या मान्सूनच्या पहिल्याच पावसाने मुंबईकरांची दैना उडविली. विशेषत: दक्षिण मुंबई आणि मध्य मुंबईतल्या बहुतांशी भागात रविवारी रात्री पडलेल्या पावसाने १०० मिलिमीटरचा आकडा पार केला आणि नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली, तर सोमवारी दिवसभर मात्र पावसाने मुंबईकडे पाठ फिरविल्याचे चित्र होते. दादर, परळ, वरळी, मरिन लाइन्ससह लगतच्या परिसरात रविवारी रात्री नऊनंतर तुफान फटकेबाजी केली. 

विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटात रात्री साडेबारापर्यंत पावसाचा धिंगाणा सुरू होता. त्यानंतर पावसाचा जोर ओसरला असला तरी सोमवारी दिवसभर मुंबईवर ढगाळ वातावरण होते. मात्र, पावसाने सपशेल पाठ फिरविल्याने मुंबईकरांचा हिरमोड झाला होता. भायखळा रेल्वे स्थानक, दादर, परळसह दक्षिण मुंबईतल्या बाजारपेठांतील सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळे रहिवाशांसह व्यापाऱ्यांच्या गाळ्यांत रात्री पाणी शिरले होते. उपनगरातही कुर्ल्यापासून लगतच्या परिसरात हजेरी लावलेल्या पावसाने घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांची दमछाक झाली होती. सोमवारी मान्सूनची सीमा राज्यातील डहाणू, नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह लगतच्या जिल्ह्यापर्यंत पोहोचली आहे.

कचरा गेला वाहून -

मान्सून दाखल होण्यापूर्वी कुर्ला येथील कमानी मार्गावरील रस्त्यालगतच्या नाल्यातील कचरा फुटपाथवर काढून ठेवण्यात आला होता. रविवारी रात्री पडलेल्या पावसानंतर बराचसा कचरा वाहून गेला होता. या भागात पाणी साचले होते. 

पहिल्याच पावसात मुंबईत पुण्यासारखी पूरसदृशस्थिती निर्माण झाली. अशा स्थितीत मुंबईची जबाबदारी असलेल्या महापालिकेसह उर्वरित प्राधिकरणे कुठे आहेत ? हा प्रश्न आहे. पायभूत सेवा सुविधा उभारताना त्यांच्या अंमलबजावणीकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र, त्याची उणीव आहे.- आदित्य ठाकरे, आमदार

मुंबईत मान्सूनपूर्व कामांत भ्रष्टाचार आणि हलगर्जीपणा करण्यात आला आहे. त्याकडे लक्ष दिले जात नाही. पावसाच्या पहिल्या सरीने अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले. नागरिकांचे हाल झाले. सत्ताधाऱ्यांनी मान्सूनपूर्व तयारीचे केलेले सर्व दावे फोल ठरले आहेत.- वर्षा गायकवाड, खासदार

टॅग्स :मुंबईदादर स्थानकभायखळामोसमी पाऊसनगर पालिका