Maharashtra Budget Session Live: राज्यपालांच्या अभिभाषणावेळी जोरदार घोषणाबाजी, संबोधन आटोपतं घेऊन राज्यपालांनी सभागृह सोडले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 11:20 AM2022-03-03T11:20:39+5:302022-03-03T11:41:49+5:30
Maharashtra Budget Session Live: महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला अपेक्षेप्रमाणे वादली सुरुवात झाली आहे. सभागृहाला संबोधित करण्यासाठी राज्यपाल उभे राहिल्यावर सभासदांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या घोषणाबाजीमुळे संबोधित करणे कठीण झाल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी संबोधन आटोपतं घेऊन विधिमंळडाचे सभागृह सोडले.
मुंबई - महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला अपेक्षेप्रमाणे वादली सुरुवात झाली आहे. आज राज्यपालांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. मात्र सभागृहाला संबोधित करण्यासाठी राज्यपाल उभे राहिल्यावर सभासदांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या घोषणाबाजीमुळे संबोधित करणे कठीण झाल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी संबोधन आटोपतं घेऊन विधिमंळडाचे सभागृह सोडले.
दरम्यान, राज्यपालांनी सभागृह सोडल्यानंतर या मुद्द्यावरून सत्ताधारी पक्षाचे नेते आणि आमदार आक्रमक झाले आहेत. सभागृहातील घोषणाबाजीनंतर सभागृह सोडणाऱ्या राज्यपालांचा धिक्कार असो अशी घोषणाबाजी सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अपमान करणाऱ्या राज्यपालांचा धिक्कार असो, राज्यपाल हटाव महाराष्ट्र बचाव अशी घोषणाबाजी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडून करण्यात आली. तसेच राज्यपालांनी महाराष्ट्र आणि घटनेचा अपमान केला आहे, असा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला आहे.
(छाया - दत्ता खेडेकर)
यावेळी काँग्रेसचे नेते नाना पटोले म्हणाले की, राज्यपालांनी महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत अपमानास्पद उद्गार काढले होते. तसेच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत अपमानकारक वक्तव्य करण्याचं धाडस ते कसे काय करू शकतात. त्याला दिल्ली दरबारचं समर्थन आहे काय. याबाबत त्यांना माफी मागावी लागेल. तसेच आता या राज्यपालांना परत पाठवण्याबाबत भूमिका घेऊन महाराष्ट्राच्या विधानसभेत वेळ आल्यास प्रस्ताव आणला जाईल, त्याबाबत कायदेशीर विचारविनिमय सुरू आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले.
याबाबत जयंत पाटील म्हणाले की, आमदार घोषणा देत होते. त्याने व्यथित होऊन राज्यपालांनी आपलं भाषण थांबवलं आणि राष्ट्रगीत न होता राज्यपालांनी सभागृह सोडलं. राज्याच्या आणि देशाच्या इतिहासात असं कधी घडलं नसेल. राज्यपाल आल्यावर महाविकास आघाडीच्या सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय याची घोषणाबाजी करत त्याचं स्वागत केलं. तर अभिषाभण सुरू असताना भाजपाच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली. त्यामुळे राज्यपाल निघून गेले असावेत.