प्रशांत दामले, अभिनेता, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई ( Marathi News ): रंगदेवता-नटराजाचे मंदिर असलेले नाट्यगृह मंदिरच वाटावे. मंदिरासारखी त्याची स्वच्छता राखायला हवी. डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचा आवार खूप मोठा आहे. तेथे नाट्यगृहाखेरीज बरेच काही करण्याजोगे आहे. पुढे छान ठेवले जाते, पण मागे अस्वच्छता असते. रंगमंदिर टापटीप ठेवायला हवे. हे नाट्यगृह खूप प्रेमाने बांधलेय, पण देखभाल करताना त्याची माती झाली आहे. या नाट्यगृहासोबतच महाराष्ट्रातील सर्व नाट्यगृहांची देखभाल करण्यासाठी फिक्स डिपाॅझिट हवे. सर्व नाट्यगृहांवर सोलर सिस्टीम बसवल्यास विजेवरील खर्च बंद होईल व नाट्यगृहांचे भाडे कमी करता येईल.
या नाट्यगृहात रंगमंच उत्तम आहे. विंगेत वावरताना त्रास होत नाही. इथला प्रेक्षक एक नंबर आहे. ॲकाॅस्टिक्स छान आहे. आसनव्यवस्थाही चांगली आहे. फक्त तिथे पोहोचायला खूप वेळ लागतो. प्रेक्षकांमुळे नाटक चालत असल्याने त्यांना आवश्यक गोष्टी पुरवायला हव्यात. स्वच्छतागृहे स्वच्छ असणे गरजेचे आहे, जे सावित्रीबाईमध्ये नसते. रंगमंचावर विविध उंचीचे लेव्हल्स उपलब्ध करून लाइट्सचे सर्व स्पाॅट्स सुरू असणे गरजेचे असते. इथे काही सुरू, तर काही बंद आहेत. मेकअप रूममधील प्रसाधनगृहाचा फ्लॅश कधीच सुरू नसतो. कायम बंद किंवा तुटलेला असतो. अनेक ठिकाणी गळती लागलेली आहे. तिथे चहा पिण्यासाठीही बरेच दूर जावे लागते. कलाकारांसाठी तिथे चहा उपलब्ध करून द्यायला हरकत नाही.
या नाट्यगृहात खूप मोकळी जागा आहे, जिथे मुक्त वाचनालय बनवता येऊ शकते. सर्व भाषिक पुस्तके ठेवल्यास लवकर येणारे प्रेक्षक पुस्तके वाचू शकतील. नाटक-साहित्याशी निगडित सगळ्या गोष्टी करता येऊ शकतात. वाॅकिंग ट्रॅक तयार करावा. सुंदर झाडे लावावीत. महाराष्ट्रातील ७०-८० टक्के नाट्यगृहांमध्ये कलाकारांसाठी बसून जेवण्याची सोय नाही. या नाट्यगृहात रात्री प्रयोग केल्यानंतर जेवायचे झाल्यास हातात डिश घेऊन उभ्याने जेवावे लागते. पिंपरी-चिंचवडला बसून जेवायचे असल्यास व्हीआयपी रूमचे ५०० रुपये भाडे आकारले जाते. नाटकाबद्दल आस्था नसलेले लोक तेथे असल्याने हे घडते. एकाच नाट्यगृहाची दर तीन-पाच वर्षांनी डागडुजी करावी लागते याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरते. प्रत्येक विभागातील नाट्यगृहाच्या व्यवस्थापनासाठी एखादी समिती नेमून त्यात रंगकर्मींना घेतल्यास काम सोपे होईल.
जे कलावंत मेहनतीने बसवलेल्या नाटकातून आपल्याला वेगळी अनुभूती देतात. त्यांना नाट्यगृहात काम करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. नाट्यगृहाविषयीच्या विधायक सूचना त्यांनी केल्या आहेत. मान्यवर कलावंत आपल्यासमोर त्यांची भूमिका मांडत आहेत. सावित्रीबाई फुले नाट्यगृहविषयी प्रख्यात अभिनेते प्रशांत दामले आपल्या भेटीला आले आहेत. आपणही 8108899877 या नंबरवरच्या व्हॉट्सॲपवर आपली प्रतिक्रिया देऊ शकता.
प्रेक्षकांच्या बोलक्या प्रतिक्रिया
अंधारात प्रेक्षकांना आसनापर्यंत सहजपणे पोहोचता यावे यासाठी फ्लोअर लाइट्स आवश्यक आहेत. आसने आरामदायक हवीत. ज्येष्ठ नागरिकांना आसनापर्यंत पोहोचताना त्रास होता कामा नये. साउंड सिस्टीम, वातानुकूलन व्यवस्था चांगली हवी. आत शिरल्यावर प्रसन्न वाटायला हवे. कोणत्याही प्रेक्षकाचे नाट्यगृहातील वास्तव्य सुखकर होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.