Join us

पावसाळ्यात महापालिका लागणार डासांच्या मागे; विशेष बैठकीचे आयोजन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2023 11:49 AM

सरकारी, निमसरकारी यंत्रणा या काहीवेळा दुर्लक्षित राहून तेथे डासांचे साम्राज्य होऊ शकते

मुंबई : काही दिवसात मुंबईत पावसाला सुरुवात होणार असून, त्यामुळे होणाऱ्या आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी मुंबई पालिकेने दंड थोपटले आहेत. पावसाळी आजाराला आळा घालण्यासाठी पालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांनी शहरातील प्रमुख सरकारी आणि निमसरकारी विभागातील अधिकाऱ्यांना बोलावून डास निर्मूलन समितीची  बैठक बुधवारी घेतली.  डासांचा बंदोबस्त करणे, हा या बैठकीचा मुख्य अजेंडा होता. यामध्ये कीटकनाशक विभागाचे आणि आरोग्य विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.  

सरकारी, निमसरकारी यंत्रणा या काहीवेळा दुर्लक्षित राहून तेथे डासांचे साम्राज्य होऊ शकते. या हेतूने या ठिकाणच्या टाक्यांजवळील डास प्रतिबंधक कार्यवाही होणे गरजेची होती. त्या कामाला सुरुवात झाली असून,  ८० टक्के काम पूर्ण झाल्याची दिली आहे. त्यामुळे आजार पसरण्यास आळा बसेल असा दावा केला आहे.

कोणत्या विभागाचे अधिकारी या बैठकीत सहभागी केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग, राज्य सार्वजनिक बांधकाम विभाग, मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, म्हाडा, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण,  मुंबई विमानतळ, मुंबई पोर्ट ट्रस्ट, नौदल, वायूदल, अभियांत्रिकी सेवा, बेस्ट, टपाल विभाग, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि., भाभा अणुसंशोधन केंद्र, दुग्ध विभाग. 

नागरिकांनी काय करावे? घरातील तसेच सभोवतालच्या परिसरातील अडगळीतील साहित्य काढून टाकावे. पाण्याच्या टाक्या झाकून ठेवाव्यात टायर, भंगार साहित्य, डबे इत्यादी काढून टाकावेत. घरातील शोभिवंत फुलदाण्या, त्याखालील बशा, कृत्रिम कारंजी, फेंगशुईची झाडे यातील पाणी आठवड्यातून कमीत - कमी दोन वेळा बदलावे. २८ हजार ८८५ पाण्याच्या टाक्या सरकारी, निमसरकारी कार्यालय परिसरात मिळून एकूण २८ हजार ८८५ पाण्याच्या टाक्या आहेत. २२,८४८ टाक्यांच्या ठिकाणी डास प्रतिबंधक कार्यवाही केली आहे. ६ हजार ३७ टाक्यांच्या ठिकाणी उपाययोजना प्रलंबित आहे.

विविध संस्थांच्या परिसरात पाण्याच्या टाक्या डास प्रतिबंधक करण्याची उर्वरित कामे तातडीने पूर्ण करावीत. डास उत्पत्ती होऊ नये, यासाठी पालिकेकडून केल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे. प्रत्येक यंत्रणेच्या प्रतिनिधीने आपल्या विभागाकडे डास निर्मूलनाच्या अनुषंगाने आर्थिक तरतुदींचा प्रस्ताव तयार करावा. - इक्बालसिंह चहल, आयुक्त, मुंबई पालिका

उंदीर पकडण्यासाठी स्वयंसेवी संस्था उंदरांच्या संख्येत घट करण्याच्या दृष्टीने प्रत्येक महिन्यात औषधी गोळ्यांचा वापर केला जात आहे. उंदीर पकडण्यासाठी पुरेशा सापळ्यांचीही व्यवस्था केली आहे. रात्रीच्या वेळेत उंदीर पकडण्यासाठीचे काम हे १७ विभागीय कार्यालयात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे.