Join us  

साथरोग रोखण्यासाठी पालिका सज्ज; कीटकनाशक व धूरफवारणी, अडगळीतील भंगार करणार जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2024 10:08 AM

दरवर्षी पावसाळ्यात साथीचे आजार पसरतात. त्यापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी पालिकेकडून विविध भागांत कीटकनाशक फवारणी केली जात आहे.

मुंबई : पावसाळा तोंडावर आल्यामुळे मुंबई महापालिकेने साथीचे आजार रोखण्यासाठी विशेष नियोजन केले आहे. पहिल्या टप्प्यात शहर व उपनगरातील झोपडपट्टीसह नवीन इमारतींचे सुरू असलेले काम, मेट्रो व अन्य विकासकामे तसेच शहराच्या अन्य भागांत कीटकनाशक व धूरफवारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या टप्प्यात सार्वजनिक ठिकाणी अडगळीत पडलेले भंगार जप्त करण्यात येणार आहे.

दरवर्षी पावसाळ्यात साथीचे आजार पसरतात. त्यापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी पालिकेकडून विविध भागांत कीटकनाशक फवारणी केली जात आहे. जेथे डासांचे प्रमाण जास्त आहे, तेथे धूरफवारणी करण्यात येत आहे. येथे १५ ते २० दिवस कीटकनाशक व धूरफवारणी केली जाणार आहे. रस्ते व गल्ल्यालगतची गटारे, चेंबर यामध्ये प्राधान्याने कीटकनाशक फवारणी करण्यात येणार आहे. त्याशिवाय मेट्रोच्या कामांच्या ठिकाणीही धूम्र व कीटकनाशक फवारणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. 

दुसऱ्या टप्प्यात इमारतींच्या बांधकामांच्या ठिकाणी भेट देऊन भंगारात पडलेले सामान जप्त करण्यात येणार आहे. त्याशिवाय पावसाळ्यात पाणी साठणार नाही, अशा वस्तू उघड्यावर ठेवू नयेत, असे आवाहनही करण्यात येणार आहे.

१)  डेंग्यू रुग्णांपैकी सुमारे ८० टक्के रुग्णांच्या घरामध्ये किंवा घराशेजारील परिसरात डेंग्यू विषाणूंचा प्रसार करणाऱ्या एडिस इजिप्टाय डासांची उत्पत्तीस्थाने आढळतात. 

२)  या डासांची उत्पत्ती साचलेल्या किंवा साठविलेल्या स्वच्छ पाण्यातच होत असल्याचे सर्वेक्षणातूनही उघड झाले आहे. 

३)  घराशेजारील परिसरात असणारे टायर, नारळाच्या करवंट्या, फोडलेली शहाळी, थर्माकोल, पत्रे, पन्हाळे, घरावर टाकलेले प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या-झाकणे, पिंप, मनी प्लांट व बांबू आदी शोभेच्या झाडांसाठी ठेवण्यात येणारे पाणी, काचेची किंवा धातूंची कासवाची मूर्ती ठेवण्यासाठी वापरणारे पाणी दिवसाआड बदलावे. 

४)  कुंड्यांखाली ताटल्या ठेवू नयेत, असे आवाहन पालिका प्रशासनाने नागरिकांना केले आहे.

टॅग्स :मुंबईनगर पालिकामोसमी पाऊस