लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : वेगमर्यादेचे उल्लंघन अपघातांना कारणीभूत ठरत असल्याने राज्यभरात वाहतूक नियंत्रण शाखेकडून राज्य, राष्ट्रीय महामार्गांसह शहरातील अन्य रिंगरोडवर ‘स्पीड गन व्हॅन’द्वारे करडी नजर ठेवत भरधाव वाहनांचा वेग रोखण्यात आला. वर्षभरात महामार्ग पोलिसांनी सुमारे ११ लाख ६ हजार ८४६ वाहनांचा वेग रोखून संबंधित वाहनचालकांना दंडाचा दणका दिला. राज्यात १३० स्पीड गनच्या माध्यमातून कारवाई करण्यात येत असल्याचे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात २०१९ मध्ये झालेल्या रस्ते अपघातात दीड लाख जणांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी एक लाख मृत्यूला वाहनांचा वेग कारणीभूत होता. सूचना फलकाद्वारे वेगावर नियंत्रण ठेवण्याबाबत जनजागृती करण्यात येतो. मात्र, अशा सूचना फलकांकडे बहुतांश वाहनचालक दुर्लक्ष करतात. त्यामुळे अशा प्रकारांवर आळा बसावा यासाठी वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येते. गेल्या वर्षी लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून डिसेंबरअखेरपर्यंत वेगमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, पोलिसांनी सुमारे ११ लाख ६ हजार ८४६ वाहनांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ११० कोटी ६८ लाख ४६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
वर्षभरात केलेली कारवाई
जानेवारी- ८३,३०९
फेब्रुवारी- ९१,०९५
मार्च- १,०४,१४४
एप्रिल- ५,८९७
मे- २४,५७४
जून- ६३,८२३
जुलै- ८१,७९८
ऑगस्ट- ८२,७५३
सप्टेंबर- १,०२,८९७
ऑक्टोबर- १,१९,३०४
नोव्हेंबर- १,६३,१३९
डिसेंबर-१,८४,२१३
एकूण - ११,०६,८४६
-
असा मोजला जातो धावत्या वाहनांचा ‘वेग’
‘इन्टरसेप्टर व्हॅनद्वारे वाहनांचा वेग अचूकपणे टिपला जातो. निश्चित केलेल्या वेगमर्यादेचे उल्लंघन संबंधित वाहनचालकांकडून केले जात असेल, तर ते या व्हॅनमध्ये असलेली आधुनिक यंत्रणा स्मार्ट कॅमेऱ्यांद्वारे अचूकरीत्या हेरते. त्यानंतर संबंधित वाहनाच्या आरटीओ नोंदणीकृत क्रमांकाच्या आधारे वाहनमालकाला ऑनलाइन दंडात्मक कारवाईचा मेसेज मिळतो. या व्हॅनमधील स्मार्ट कॅमेरे सुमारे १ कि.मी. अंतरापर्यंत वाहने सहज टिपतात.
कोट-
अपघाती मृत्यूमध्ये प्रमुख कारण वाहनांचा वेग आहे. या वेगाच्या मोहापायी अनेकांचा बळी जातो. महामार्ग पोलीस स्पीड गनद्वारे कारवाई करतात. ८० पेक्षा जास्त वेग अपघातास कारणीभूत ठरतो.
- सुनीता साळुंखे-ठाकरे, महामार्ग पोलीस अधीक्षक