मुंबई : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या दसऱ्याला यंदा मुंबईत रेकॉर्डब्रेक सोने खरेदी झाली. कोरोनानंतर पहिल्यांदाच सराफ बाजारात ४०० कोटींचा व्यवसाय झाल्याने व्यापारी आनंदात आहेत. विशेष म्हणजे सोन्याचे दर ४९,५९० रुपये प्रति तोळा असूनही नागरिकांनी गुंतवणुकीसाठी सोने खरेदीला प्राधान्य दिले. सराफ बाजारातील व्यापाऱ्यांनी यंदा राज्यात ४०० कोटींची सोने खरेदी व मुंबईत २०० कोटींची सोने खरेदी होईल, असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र यंदाच्या दसऱ्याला एकट्या मुंबईत ४०० कोटींची सोने खरेदी झाली आहे. मागील दीड वर्षात अनेकांना सोने खरेदी करता आले नाही. त्यात गेल्या वर्षभरात केलेल्या काटकसरीमुळे जमा झालेल्या पैशांतून यंदा नागरिकांनी भरपूर प्रमाणात सोन्याची खरेदी केली. त्यामुळे यंदाचा दसरा व्यापाऱ्यांसाठी आनंद द्विगुणित करणारा ठरला आहे.मुंबईतील विविध परिसरांमधील बाजारपेठांमध्ये खरेदीला उधाण आले होते. या खरेदी सोबतच कार्यालयांमध्ये, ट्रेन व बसमध्ये, तसेच मित्र-मैत्रिणींनी व कुटुंबातील सदस्यांनी आपट्याची पाने देत दसऱ्याचा आनंद लुटला.
दसऱ्याला मुंबईत रेकॉर्डब्रेक सोने खरेदी; चारशे कोटींचा ओलांडला टप्पा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 9:59 AM