Join us

शिक्षक भरतीसाठी दसऱ्याची डेडलाईन ; शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदेही भरणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 7:58 AM

राज्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

मुंबई : राज्यातील शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या तीन महिन्यात २४ ऑक्टोबरपर्यंत  शिक्षक भरतीची प्रक्रिया पूर्ण करणार असल्याची घोषणा शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली. यावेळी त्यांनी भरती प्रक्रियेचा कार्यक्रमही जाहीर केला.  

शिक्षक सदस्य सुधाकर अडबाले  यांनी शिक्षक भरतीबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेला उत्तर देताना मंत्री केसरकर म्हणाले, शिक्षक भरती प्रक्रियेवर उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्वाधिकारे दखल घेत स्थगिती दिली होती. न्यायालयाने ही स्थगिती उठविली असून शिक्षक भरती सुरू झाली आहे. या भरतीचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. २४ ऑक्टोबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल.  

निवृत्त शिक्षकांची भरती कायमस्वरूपी नाही 

न्यायालयाची स्थगिती अनपेक्षित होती. या मधल्या काळात आंतरजिल्हा बदल्या झाल्या. त्यामुळे अनेक ठिकाणी शिक्षकांची पदे रिक्त झाली. या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी तात्पुरती व्यवस्था म्हणून निवृत्त शिक्षकांना संधी देण्यात आली आहे. ही कायमस्वरूपी व्यवस्था नाही. नव्या उमेदवारांना संधी दिली असती तर गोंधळ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून निवृत्त शिक्षकांना नियुक्त केल्याचे उत्तर मंत्री केसरकर यांनी दिले.

असा आहे भरती कार्यक्रम 

या शिक्षक भरतीसाठी जिल्हा परिषदांनी आपली बिंदुनामावली कायम करून पोर्टलवर जाहिरातीसाठी १५ ते ३१ ऑगस्ट २०२३ हा कालावधी निश्चित करण्यात आला आहे.उमेदवारांनी प्राधान्यक्रम देण्यासाठी १ ते १५ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. मुलाखतीसह गुणवत्ता यादी १० ऑक्टोबरला प्रसिद्ध केली जाईल. 

मुलाखतीशिवाय पदभरती उमेदवारांची पडताळणीसाठी ११ ते २१ ऑक्टोबर आणि जिल्हास्तरीय समुपदेशनासाठी २१ ते २४ ऑक्टोबर हा कालावधी निश्चित करण्यात आल्याचे मंत्री केसरकर यांनी स्पष्ट केले. 

२०१२ पासून सरकारने भरती बंद केली होती. 

२०१७ मध्ये १२ हजार पदांसाठी भरती काढली. ही प्रक्रिया पुढे कोरोनामुळे रखडली. २०२३ मध्ये ३० हजार पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली. प्रतिक्षा कायम आहे.

टॅग्स :दीपक केसरकरमुंबईशिक्षक