दसरा, दिवाळीत घर घेताय; महारेराची जुनीच वेबसाइट वापरा, तांत्रिक अडचणींमुळे गैरसोय टाळण्यासाठी महारेराने घेतला निर्णय
By सचिन लुंगसे | Published: October 4, 2024 10:38 PM2024-10-04T22:38:16+5:302024-10-04T22:38:35+5:30
MahaRERA News: दिवाळी, दसरा या सणासुदीच्या काळात नवीन घरांची नोंदणी करणे, नवीन घर विकत घेणे, बिल्डरांनी नवीन गृहनिर्माण प्रकल्प सुरू करणे असे व्यवहार मोठ्या प्रमाणात केले जातात.
मुंबई - दिवाळी, दसरा या सणासुदीच्या काळात नवीन घरांची नोंदणी करणे, नवीन घर विकत घेणे, बिल्डरांनी नवीन गृहनिर्माण प्रकल्प सुरू करणे असे व्यवहार मोठ्या प्रमाणात केले जातात. अशावेळी सर्व संबंधितांना महाकृती वेबसाइटवर तांत्रिक त्रुटींमळे अडचणींना सामोरे जायला लागू नये यासाठी जुनी वेबसाइट ५ ऑक्टोबरच्या मध्यरात्री ११.५९ पासून वापरात आणण्याचे निर्देश महारेरा अध्यक्ष मनोज सौनिक यांनी दिले आहेत. महारेराने ३१ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून महाकृती ही नवीन वेबसाइट सुरु केली होते. तांत्रिक त्रुटींमुळे ही वेबसाइट सध्या महारेराने तात्पुरती मागे घेतली आहे.
महारेराच्या महाकृती या नवीन वेबसाइटचा वापर करताना घरखरेदीदार, बिल्डर, एजंटस आणि इतर भागधारकांना त्यांचे व्यवहार करताना काही अडचणींना समोरे जावे लागत आहे, असे महारेराच्या निदर्शनास आले आहे. महारेराचे अध्यक्ष मनोज सौनिक यांनी संबंधितांसोबत याबाबत आढावा बैठक घेतली. आणि यासंदर्भातील निर्देश दिले. त्यामुळे ५ ऑक्टोबरच्या मध्यरात्री ११.५९ पासून ३१ ऑगस्टपूर्वी महारेरात कार्यरत असलेली महाआयटीसंचालित वेबसाइट सुरू होणार आहे. महारेराच्या सर्व सेवांसाठी भागधारकांनी या वेबसाइटचा वापर करावा. संबंधितांनी बदलाची नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे, असे आवाहन महारेराच्या वतीने करण्यात आले आहे.