ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 04:18 AM2024-09-21T04:18:48+5:302024-09-21T04:19:47+5:30
शिवसेनेत फूट पडल्यानंतर दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानासाठी दोन्ही गटांत संघर्ष होत आला आहे.
मुंवई : दरवर्षीप्रमाणे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदानासाठी उद्धवसेना आणि शिंदेसेना यांच्यात यंदा संघर्ष निर्माण होणार नाही, असे दिसते. शिंदेसेना गटाकडून अजून तरी मैदानासाठी अर्ज करण्यात आलेला नाही. उद्धवसेनेकडून मात्र तीन महिन्यांपूर्वीच अर्ज करण्यात आला आहे. त्यामुळे शिंदे गटाचा दसरा मेळावा हा वांद्रे-कुर्ला संकुलात (बीकेसी) होण्याची चिन्हे आहेत.
शिवसेनेत फूट पडल्यानंतर दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानासाठी दोन्ही गटांत संघर्ष होत आला आहे. २०२२ मध्ये शिवाजी पार्कचे प्रकरण न्यायालयात गेले होते. पहिल्यांदा अर्ज केल्याने आम्हाला मैदान मिळावे, असा उद्धवसेनेचा दावा होता. तर पहिल्या अर्जाचा दावा शिंदे गटानेही केला होता. या वादात न्यायालयाने ठाकरे यांच्या बाजूने कौल दिल्यानंतर शिंदेसेनेने ‘बीकेसी’त मेळावा घेतला होता. मागील वर्षी याच मुद्द्यावरून दोन्ही गट पुन्हा आमने-सामने आले होते. प्रशासन निर्णय घेत नसल्याने ठाकरे गटाने विभाग कार्यालयावर मोर्चाही नेला होता. मात्र, त्यानंतर शिंदेसेनेने मैदानासाठीचा अर्ज मागे घेतल्याने संघर्ष टळला होता.
तीन स्मरणपत्रे पाठवली
यंदा ठाकरे गटाकडून मैदानासाठी परवानगी मिळावी, यासाठी विभागप्रमुख महेश सावंत यांनी अर्ज दिला आहे. याप्रकरणी ठाकरे गटाच्या वतीने पालिकेला तीनदा स्मरणपत्रही पाठवले आहे.
मात्र, अद्याप निर्णय कळवण्यात आलेला नाही. यासंदर्भात शिंदेसेनेचे आमदार सदा सरवणकर यांच्याशी संपर्क साधला असता, अर्ज करण्याबाबत पक्षाकडून मला सूचना करण्यात येते. यंदा अद्याप तरी मला पक्षाकडून काही कळवण्यात आलेले नाही, असे ते म्हणाले.
आजही आम्ही पुन्हा पालिकेला स्मरणपत्र पाठवले. उद्या आम्ही यासंदर्भात पालिका उपयुक्तांसोबत बैठक घेणार आहोत. पालिका प्रशासन मुद्दाम वेळकाढूपणा करत आहे.
- महेश सावंत, विभागप्रमुख, उद्धवसेना