Join us

दसरा मेळावा : शिंदे गटालाच मैदान मिळणार होते पण...; ‘या’ कारणासाठी मागे घेतला अर्ज

By जयंत होवाळ | Published: October 12, 2023 12:16 PM

या मुद्द्यावरून ठाकरे  गटाला आणखी सहानुभूती मिळू नये, हे प्रकरण  न्यायालयात गेल्यास मागील वर्षीची पुनरावृत्ती होऊ नये, या दोन बाबींवर सावध भूमिका घेत शिंदे गटाने अर्ज मागे घेण्याचे पाऊल उचलल्याचे समजते.

मुंबई : दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान वापरण्यास परवानगी मिळण्याबाबत  एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आपला अर्ज मागे घेतला आहे. मात्र, पालिकेच्या नियमानुसार हे मैदान शिंदे गटाला मिळणार होते, असे खात्रीलायकरीत्या कळते. शिंदे यांच्याही शिवसेनेला याची जाणीव  होती. मात्र, या मुद्द्यावरून ठाकरे  गटाला आणखी सहानुभूती मिळू नये, हे प्रकरण  न्यायालयात गेल्यास मागील वर्षीची पुनरावृत्ती होऊ नये, या दोन बाबींवर सावध भूमिका घेत शिंदे गटाने अर्ज मागे घेण्याचे पाऊल उचलल्याचे समजते.

‘प्रथम अर्ज करणाऱ्यास प्राधान्य’, हे पालिकेचे धोरण आहे. शिंदे गटाच्यावतीने आमदार सदा सरवणकर यांनी १ ऑगस्ट रोजी, तर ठाकरे गटाच्यावतीने ७ ऑगस्ट रोजी अर्ज आला होता, अशी माहिती पालिकेच्या एका  वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. 

प्रथम अर्ज करणाऱ्यास प्राधान्य, या तत्त्वावर मैदान शिंदे गटाला मिळू शकत होते, असे या अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, पहिला अर्ज आमचाच, असा दावा दोन्ही गटांकडून केला गेला होता. 

- अधिकृत पक्ष आणि पक्षचिन्ह, तसेच दरवर्षी  दसरा मेळाव्यासाठी कोणाचा अर्ज येतो, यापूर्वी त्यासाठी कोणाला परवानगी दिले गेली होती, हा दुसरा निकषही पालिका विचारात घेते. या निकषाचा विचार केल्यास शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. 

- अर्थात मूळ शिवसेना शिंदे यांची, यावर निवडणूक आयोगानेच शिक्कामोर्तब केले आहे. म्हणजे अधिकृत शिवसेना म्हणून शिंदे गटाची बाजू उजवी ठरली असती. शिवाय भले अलीकडच्या काळातच पक्ष आणि चिन्ह शिंदे यांच्या ताब्यात आले असले तरी अधिकृत शिवसेना म्हणून याच पक्षाच्यावतीने दरवर्षी अर्ज येतो, अशीच मांडणी झाली असती. एकूणच विविध निकषांवर यंदा शिंदे गटाने बाजू मारली असती. मात्र, त्यांनी अर्जच मागे घेतल्याने प्रकरण निकालात निघाले आहे.

... म्हणून सोडला दावा शिवाजी पार्क मैदानावरून मागील वर्षी शिंदे आणि ठाकरे गटात संघर्ष उडून प्रकरण न्यायालयात गेले होते. न्यायालयाने ठाकरे यांच्या बाजूने कौल दिला होता. शिवाय दसरा मेळावा आणि शिवसेना हे समीकरण दृढ असल्याने लोकांची बऱ्यापैकी सहानुभूती ठाकरे यांना आहे. 

यंदाही शिवाजी पार्क मुद्द्यावरून ठाकरे गटाने वातावरण लावण्यास सुरुवात केली होती. ठाकरे गटाला जास्तीची सहानुभूती मिळू नये, यासाठीच शिंदे गटाने मैदानावरील दावा सोडल्याचे समजते. त्याचबरोबर आमचे मन किती मोठे आहे, हेही दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. 

टॅग्स :दसराशिवसेनाएकनाथ शिंदेउद्धव ठाकरे