'दसरा मेळाव्याला १० लाखांच्या वर गर्दी होईल; कोणालाही नेणार नाही, लोकं स्वखुशीने येतील'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 04:26 PM2022-09-28T16:26:41+5:302022-09-28T16:27:06+5:30
मंत्री तानाजी सावंत आपल्या विधानामुळे सातत्याने चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांना हाफकीनवरुन ट्रोल करण्यात आलं होतं
पुणे/मुंबई - मुंबईतील शिवाजी पार्क म्हणजेच शिवतिर्थावर दसरा मेळावा कोण घेणार, यावरुन चांगलाच वाद पेटला होता. बंडखोर शिंदे गटानेही दसरा मेळाव्याची घोषणा केली. विशेष म्हणजे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी दसरा मेळाव्यासाठी शिवतिर्थ मैदाना मिळावं म्हणून महापालिकेकडे अर्जही केला होता. मात्र, हे प्रकरण उच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने शिवसेनेला म्हणजेच ठाकरे सरकारला येथील मैदानावर परवानगी दिली आहे. तर, बीकेसीच्या मैदानावर शिंदे गटाचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला १० लाखांपेक्षा अधिक लोकं येतील, असे मंत्री तानाजी सावंत यांनी म्हटले आहे.
मंत्री तानाजी सावंत आपल्या विधानामुळे सातत्याने चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी त्यांना हाफकीनवरुन ट्रोल करण्यात आलं होतं. तर, दोन दिवसांपूर्वी त्यांनी उस्मानाबादेतील सभेत भाषण करताना मराठा आरक्षणावरुन बाजू मांडताना मराठा समाजाच्या भावना दुखावल्या होत्या. त्यावरुन, अखेर त्यांनी माफीही मागितली. आता, शिवसेना विरुद्ध शिंदेगट असा सामना रंगला आहे. दसरा मेळाव्यावरुन दोन्ही गट आमने-सामने येत आहेत. दोन्ही गटांनी दसरा मेळाव्याला गर्दी करण्यासाठी शिवसैनिकांना आवाहन केलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर तानाजी सावंत यांनी मीडियाशी बोलताना, आमच्या दसरा मेळाव्याला १० लाखांहून अधिक लोकं मुंबईत येतील, असे म्हटले.
दसरा मेळाव्यासाठी तुमच्या मतदारसंघातून कार्यकर्ते घेऊन या, असे मला अजून तरी सांगितलेलं नाही, माणसं आणायची जबाबदारी असं काही नाही. लोकांचाच उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. लोक स्वखुशीने येणार आणि आमचा दसरा मेळावा दहा लाखाच्या पुढे होणार. माझ्या मतदारसंघातील लोकही खुशीने येतील, आम्ही कोणाला नेणार नाही, असेही सावंत यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, दसरा मेळावा हा विचारांचा असतो कोणा एका व्यक्तीचा नसतो. मी प्रक्रियेत आहे की नाही तुम्हाला दिसेल. मी सगळ्यात असतो, पण सगळ्याच गोष्टी तुमच्याशी शेअर का करायच्या, असेही सावंत यांनी म्हटले.