Join us

आपट्याची पाने लुटण्याची प्रथा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2019 2:28 AM

नवरात्रौत्सवाची परिसीमा म्हणजेच विजयादशमी अर्थात दसरा होय. साडेतीन मुहूर्तांपैकी एक सुमुहूर्त असलेल्या या सणाला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते.

नवरात्रौत्सवाची परिसीमा म्हणजेच विजयादशमी अर्थात दसरा होय. साडेतीन मुहूर्तांपैकी एक सुमुहूर्त असलेल्या या सणाला धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा केली जाते. त्याचे प्रतीक म्हणून सोने म्हणजेच आपट्याची पाने, पाटी-पुस्तके अर्थात सरस्वतीदेवीची आणि शस्त्रास्त्रांचे पूजन करण्यात येते.या दिवशी सोने लुटण्याची म्हणजेच आपट्याची पाने मित्रपरिवाराला वाटून शुभेच्छा देण्याची प्रथा आहे. पूर्वीच्या काळी विद्यार्जनाचा श्रीगणेशा दसऱ्याला सरस्वतीचे पूजन करून होत असे. धनसंपदा (महालक्ष्मी), शक्ती (महाकाली), ज्ञानसंपदा (महासरस्वती) या तीन शक्ती देवतांचे स्मरण दसºयाला केले जाते. तसेच नवरात्रौत्सवात बसविलेल्या देवी मूर्ती आणि घटांची मिरवणूक काढून विसर्जन केले जाते. अनेक सण- उत्सवातील प्रथा-परंपरा काळानुरूप लोप पावत असल्या तरी दसºयाला सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याच्या झाडाची पाने लुटण्याची प्रथा आजही टिकून आहे. महाभारत काळात पांडवांनी अज्ञातवासात जाण्याआधी आपली शस्त्रास्त्रे श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून आपट्याच्या झाडावर लपवून ठेवली होती. अज्ञातवासाचे वर्ष पूर्ण झाल्यावर ती शस्त्रास्त्रे बाहेर काढली तेव्हा सोन्यासारखी उजळून निघाली होती. त्याची आठवण म्हणून दसºयाला आपट्याची पाने सोने म्हणून देण्याची प्रथा आहे. याशिवाय इतरही अनेक पौराणिक कथा या सणाबद्दल प्रचलित आहेत. रामाने रावणास मारले आणि या विजयानिमित्त ‘विजयादशमी’ साजरी केली जाते.

टॅग्स :आध्यात्मिक