दसरा मेळाव्याचा ‘आवाज’ वाढला
By Admin | Published: October 13, 2016 06:58 AM2016-10-13T06:58:03+5:302016-10-13T06:58:03+5:30
दादर येथील शिवाजी पार्कवर मंगळवारी झालेल्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला युती तोडण्याचा धमकीवजा इशारा
मुंबई : दादर येथील शिवाजी पार्कवर मंगळवारी झालेल्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला युती तोडण्याचा धमकीवजा इशारा दिला असतानाच या मेळाव्याने ‘शांतता क्षेत्रा’च्या नियमांचा भंग करत कमालीचे ध्वनिप्रदूषण केल्याचा आरोप आवाज फाउंडेशनच्या
सर्वेसर्वा सुमेरा अब्दुलअली यांनी केला आहे.
सुमेरा या स्वत: दसरा मेळाव्याला उपस्थित होत्या. या वेळी त्यांनी आवाजाची पातळी मोजली. विशेष म्हणजे मेळाव्यादरम्यान ध्वनिप्रदूषण होत असताना येथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता, असेही सुमेरा यांचे म्हणणे आहे. शांतता क्षेत्रात लाऊडस्पीकरचा वापर करण्यात येऊ नये आणि यात कोणतीही गोष्ट अपवादात्मक असू नये, असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
मात्र असे असतानाही आयोजकांकडून न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करण्यात आल्याचे सुमेरा यांनी सांगितले. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृह खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव के.पी. बक्षी आणि पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्यासह अन्य विभागांनाही निवेदन देण्यात आले आहे. (प्रतिनिधी)