मुंबईत उडाला प्रचाराचा धुरळा
By admin | Published: February 20, 2017 06:57 AM2017-02-20T06:57:43+5:302017-02-20T06:57:43+5:30
‘जागे व्हा, आम्हालाच मतदान करा’, ‘कोण आला रे कोण आला’, ‘ताई, माई अक्का’ अशा घोषणा बाइकच्या आवाजात
टीम लोकमत /मुंबई
‘जागे व्हा, आम्हालाच मतदान करा’, ‘कोण आला रे कोण आला’, ‘ताई, माई अक्का’ अशा घोषणा बाइकच्या आवाजात मिसळत होत्या आणि विविध रंगाच्या झेंड्यांत मुंबई न्हावून गेली होती. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी रविवारी मुंबईत राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही शक्तिप्रदर्शन केले. सर्वच पक्षांनी मतदारांची भेट घेण्यासाठी सकाळपासूनच सुरुवात केली होती. सायं. साडेपाचनंतर उघड प्रचाराची सांगता झाल्यानंतर गुप्त हालचालींना वेग आला. त्यांच्या ‘अर्थ’पूर्ण वाटाघाटी सुरू होत्या. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत उमेदवारांची निवडणूक प्रचार कार्यालये, पक्षाची कार्यालये व शाखांमध्ये गर्दी कायम होती.
ढोलताशांचा गजर, गळ्यात पक्षाचे चिन्ह असलेली मफलर, डोक्यावर टोपी अशा अवतारात कार्यकर्ते पदयात्रा आणि रॅलीत सहभागी होते. एकंदरच हा शेवटचा दिवस ‘लास्ट अॅण्ड बेस्ट’ पद्धतीने त्यांनी कामी आणला. पण सायंकाळी प्रचाराची मुदत संपल्यानंतर सर्व पक्षांच्या उमेदवारांकडून आपली प्रचार मोहीम आटोपती घेण्यात आली.
पूर्व उपनगरात उमेदवार आमने-सामने
मुलुंड, भांडुप, घाटकोपर परिसरात रविवार सकाळपासूनच प्रचार फेऱ्यांनी वेग घेतला होता. नव्या वॉर्ड रचनेमुळे अन्य प्रभागातील उमेदवार प्रभागांच्या सीमेवर एकत्र दिसले. मुलुंड, भांडुपच्या गल्लीबोळांत हे वासुदेव प्रचार करत होते. नाराज कार्यकर्ते मनसे रॅलीतून गायब झाले. घाटकोपरमध्ये बॅन्जोच्या तालावर कार्यकर्त्यांनी नाचही केला. तर महिला उमेदवारांनी दारोदारी हळदीकुंकू घेत प्रचार केला. चेंबूरच्या आरसी मार्गावर रॅलीमुळे वाहतूककोंडी झाली. वाशी नाका येथे एकाच वेळी सेना, मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची रॅली आल्याने वाहतूक पोलिसांची तारांबळ उडाली होती.
मॉर्निंग वॉक ते गळाभेट..!
कुलाबा, कफ परेड, गिरगाव, भायखळा, ताडदेव, उमरखाडी परिसरात प्रचाराच्या अखेरच्या दिवशी परिसरातील उद्यानांमध्ये जाऊन मॉर्निंग वॉकला आलेल्या स्थानिकांची भेट घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर सूर्य डोक्यावर आल्यावर पाण्याचे ग्लास अन् बाटल्या संपवित कार्यकर्त्यांनी प्रचारात वेग आणला. सकाळी ११नंतर बाईक रॅली, प्रचार फेऱ्यांचे आवाज कानी पडू लागले, तर दुसरीकडे काही उमेदवारांनी चौक सभा घेतल्या. चार-साडेचारच्या सुमारास बऱ्याच ठिकाणचे उमेदवार आपल्या पक्ष कार्यालयांमध्ये कार्यकर्त्यां सोबत काही पुढची रणनीती ठरवित बसल्याचे दिसून आले.
विविध रंगाचे
झेंडे फडकले!
चुनाभट्टी, चांदिवली भागातही प्रचाराचा वेग वाढला होता. रोड शो, दुचाकी-चारचाकी रॅलीचा धुरळा रविवारी उडाला. काही ठिकाणी ‘डोअर-टू-डोअर’ प्रचारावर उमेदवारांनी भर दिला. शेवटच्या दिवशी ‘वेगात’ शक्तिप्रदर्शनावर बहुतांश उमेदवारांनी भर दिला. प्रभाग १६६मध्ये तीन पक्षांच्या रॅलींमुळे काही काळ वाहतूककोंडी झाली. शिवाय हॉर्नमुळे मतदार हैराण झाले होते. सर्वाधिक ३१ उमेदवार असलेला प्रभाग १६४ विविध रंगाच्या झेंड्यांनी सजला होता.
सर्वांचे शक्तिप्रदर्शन
वांद्रे पूर्व आणि पश्चिम ते सांताक्रुझ पूर्व, पश्चिम परिसर या भागात दिवसभर सर्वच राजकीय पक्षांनी शक्तिप्रदर्शन केले. प्रभाग क्रमांक ९३मधील आरपीआय उमेदवाराने रिक्षा रॅली काढली. प्रभाग ९४मध्ये शिवसेना आणि मनसेच्या दोन उमेदवारांमध्ये बाइक रॅली काढताच स्पर्धा निर्माण झाली. ८७मधील भाजपा व सेनेच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शनापेक्षा घरोघरी जाऊन प्रचार केला. प्रभाग ९८मधील काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी आणि शिवसेना उमेदवारांमध्ये प्रचारात चुरस रंगली होती.
पश्चिम उपनगरात प्रचार जोमात
पश्चिम उपनगरातील गोरेगाव, कांदिवली, चारकोप, बोरीवली, मालाड, गोरेगाव या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने प्रचार फेऱ्या रंगल्या. काही ठिकाणी ढोलताशांच्या मदतीने प्रचार रॅली काढण्यात आली. तर, एका उमेदवाराच्या प्रचार फेरीत भारताचा माजी फलंदाज विनोद कांबळी यांनी भाग घेतला. वेसावे कोळीवाड्यात प्रभाग ६०मध्ये निघालेल्या प्रचारफेरीत कोळी बांधव पारंपरिक वेषात सहभागी झाले होते.
खुन्नस देत प्रचार
गेल्या काही दिवसांपासून प्रचारकार्याचा मंदावलेला वेग रविवारी वाढल्याचे दृश्य सर्वत्र दिसत होते. काही परिसरात तर स्थानिक आमदार प्रचार कार्यात सहभागी होऊन त्यांच्या उमेदवाराचे मनोबल वाढवत होते. बाइकवर ट्रिपल सीट स्वार झालेले कार्यकर्ते हातात आपापल्या पक्षाचे झेंडे घेऊन नारेबाजी करत विरोधी पक्षाला ‘खुन्नस’ दाखवत फिरत होते.