मुंबई शहरावर धूलिकणांची चादर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2018 03:32 AM2018-10-05T03:32:09+5:302018-10-05T03:32:33+5:30
वरळीत सर्वाधिक धूलिकण : मान्सून परतल्याने प्रमाण वाढले
मुंबई : शहर आणि उपनगरात आॅक्टोबर हीट सुरू झाली असून वाढत्या उष्णतेमुळे मुंबईकर हवालदिल झाले आहेत. उष्णतेच्या बरोबरीने मुंबईकरांना धूलिकणांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ‘सफर’हे संकेतस्थळ हवेतील धूलिकणाचा आढावा घेते़ त्यांच्या अहवालानुसार वरळीत धूलिकणांचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून आले. धूलिकणांचे प्रमाण कमी होण्यासाठी झाडे लावण्याचे आवाहन पर्यावरणप्रेमींनी केले आहे.
मान्सून परतल्याने आणि आॅक्टोबर महिना सुरू झाल्याने वातावरणातील धूलिकणांचे (पार्टिक्युलेटर मॅटर) प्रमाण पुन्हा वाढले आहे. वरळीमध्ये धूलिकणांचे प्रमाण ३२२ वर पोहोचले होते. हे प्रमाण हवेच्या गुणवत्तेमधील सर्वात खराब प्रमाण असल्याचे सफर संकेतस्थळावर नमूद आहे़. मुंबई शहरातील माझगाव, कुलाबा, पश्चिम उपनगरातील बोरीवली, मालाड, अंधेरी, पूर्व उपनगरातील भांडुप, वांद्रे-कुर्ला संकुल, चेंबूर आणि नवी मुंबई येथे हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणावर घसरल्याची नोंद ‘सफर’ने केली आहे. वातावरणातील या स्थितीमुळे उंच इमारती धुरक्यात हरवल्याचे चित्र तयार झाले आहे. विशेषत: सायंकाळसह रात्री उशिरापर्यंत वाहणाऱ्या गरम वाºयांमुळे मुंबईकर चांगलेच त्रस्त झाले आहेत. वातावरणात मोठ्या प्रमाणावर धूलिकण पसरल्याने वाहनचालकांना वाहने चालविणे कठीण झाले आहे. पूर्व आणि पश्चिम उपनगरातील धूलिकणांचे प्रमाण वाढतच राहिले तर पुढील दिवसात दोन्ही महामार्गांवर वाहन चालविण्यास वाहनचालकांना आव्हानात्मक होण्याची भीती वाहनचालकांनी व्यक्त केली आहे.
मुंबई प्रादेशिक हवामान खात्याचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, मान्सून संपल्यावर धूलिकणांचे प्रमाण वाढते. पावसाळ्यात जमिनीवर स्थिरावलेले धूलिकण पावसाळ्यानंतर हवेत सामील होतात. वाहत्या वाऱ्याच्या दिशेने धूूलिकण वाहत जातात. रहदारी, वाहतूक, इमारतीचे बांधकाम यामुळे धूलिकणांची संख्या वाढली आहे. सध्या मुंबईत उत्तरेकडून उष्ण वारे वाहत असल्याने आॅक्टोबर हीट जाणवत आहे. नोव्हेंबर महिन्यात उत्तर भारताकडून गार वारे वाहतील, तेव्हा उष्णता कमी जाणवेल, असे त्यांनी सांगितले.
हवेतील गुणवत्तेचे प्रमाण ‘पार्टीक्युलेट मॅटर’मध्ये
वरळी ३२२
अंधेरी १९४
वांद्रे-कुर्ला संकुल १६९
बोरीवली ११३
माझगाव १०९
भांडुप ९३
चेंबूर ७६
मालाड ७४
कुलाबा ७४
नवी मुंंबई १७८