लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्स्प्रेसला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद लाभला आहे. मात्र, त्याचबरोबर या आलिशान गाडीतील सेवांमधील त्रुटीही समोर येऊ लागल्या आहेत. एका प्रवाशाने कॉर्नफ्लेक्सची ऑर्डर दिली. मात्र, त्यात धुळमिश्रित कॉर्न्स असल्याचे निदर्शनास आल्याने सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, रेल सेवेनेही तातडीने या तक्रारीची दखल घेतली आहे.
वीरेश नारकर या प्रवाशाने रविवारी ट्विटरवर एक फोटो शेअर करून साईनगर शिर्डीला जाताना ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जाबाबत तक्रार केली आहे. तक्रारीत ते म्हणतात, वंदे भारतने शिर्डीला जात आहे. परंतु काही बाबी सुधारण्याची गरज आहे. तसेच खाद्यपदार्थाचा दर्जा सुधारला पाहिजे. भारतात धूळयुक्त कॉर्नफ्लेक्स नंबर प्रथम क्रमांकाची पसंती मिळत आहे. वंदे भारतला एक्झिक्युटिव्ह क्लास ट्रेनच्या मधोमध दिला आहे त्यामुळे इतर क्लासचे प्रवासी सतत फिरत राहतात. एक्झिक्युटिव्ह क्लासला जास्त पैसे देऊनही सर्वांची ये-जा असते. त्यामुळे हा डबा गाडीच्या शेवटी किंवा सुरुवातीला असावा, असेही त्यांनी सुचवले आहे. तसेच अन्य एका प्रवाशाने एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये सर्व्ह केल्या जाणाऱ्या अन्नाचा वास येत असल्याचे तक्रार नोंदवली आहे.