मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अपशब्द वापरल्याप्रकरणी शिवसेनेचे माजी महापौर आणि उप नेते दत्ता दळवी यांना आज पोलिसांनी अटक केली. दुपारी दळवींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. परंतू, न्यायालयाने दळवींना जामीन दिला नाही. यामुळे ठाकरे गटाने उद्या जामीन न मिळाल्यास ईशान्य मुंबई बंद करून रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.
भूषण पलांडे यांच्या तक्रारीनंतर भांडुप पोलिसांनी दत्ता दळवी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे दत्ता दळवी यांना त्यांच्या विक्रोळी येथील राहत्या घरातून अटक करण्यात आली आहे. दत्ता दळवी यांना भांडूप येथील पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले होते. न्यायालयाने जामीन मंजूर न केल्याने दत्ता दळवींची रवानगी ठाण्याच्या तुरुंगात करण्यात आली आहे.
यावर ठाकरे गटाचे आमदार सुनिल राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. पोलीस यंत्रणेवरती दबाव आहे. त्यामुळे खोट्या पद्धतीने गुन्हा नोंद करून दत्ता दळवी यांना अटक करण्यात आली आणि जामीन ही दिला नाही. दत्ता दळवी यांच्या तुरुंगात रवानगी नंतर शिवसैनिक आक्रमक होत जोरदार घोषणाबाजी केली. उद्या जामीन मिळाला नाही तर उद्या संपूर्ण ईशान्य मुंबई बंद करणार रास्ता रोको करणार, असल्याचा इशारा राऊत यांनी दिला आहे.
पोलिसांवर दबाव असल्यामुळे जामीन प्रक्रिया जाणीवपूर्वक लांबणीवर टाकण्यात आली. पोलिसांवर दबाव असल्यामुळेच त्यांनी आपले म्हणणे न्यायालयात मांडले नाही, त्यामुळे जामीन मिळाला नाही, असा आरोप राऊत यांनी केला.
नेमकं काय आहे प्रकरण?शिवसेना उबाठा गटातर्फे रविवारी भांडुपमध्ये ईशान्य मुंबईत राहणाऱ्या कोकणवासीयांचा जाहीर मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे राजस्थान प्रचारावेळी लावण्यात आलेल्या 'हिंदुह्रदयसम्राट' या उपमेवरून दत्ता दळवी यांनी शिवीगाळ केली. सार्वजनिक सभेत संविधानिक पदावर बसलेल्या व्यक्तीबद्दल शिवीगाळ व अपमानकारक विधान केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे उपविभागप्रमुख भूषण पालांडे यांनी भांडुप पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. त्यानुसार, भांडुप पोलिसांनी दत्ता दळवी यांच्याविरोधात भादंवि कलम 153 (अ),153 (ब),153(अ)(1)सी, 294, 504,505(1)(क) अन्वये गुन्हा दाखल केला होता.