मुंबई : नर्सिंग सहकाऱ्यांना लसीकरणात सहकार्य करणे, वायल्सबाबत योग्य ते मार्गदर्शन करणे तसेच लस घेतल्यानंतर एखाद्याची प्रकृती बिघडलीच तर त्यासाठी धावपळ करीत त्यांना उपचार मिळवून देणे या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेने प्रत्येक कोविड लसीकरण केंद्रावर एका डॉक्टरला नियुक्त केले आहे. मात्र वॉर्ड क्रमांक २६ येथील संतमंत अनुयायी आश्रम येथे लसीकरण सुरू असतानाच 'ऑन ड्यूटी' महिला डॉक्टर सहकाऱ्यांना काहीच न सांगता बेजबाबदारपणे तासन्तास गायब होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नर्सिंग स्टाफकडे याबाबत चौकशी करीत सत्य उघड करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
या सदर लसीकरण केंद्रावर ६ जुलै रोजी नवीन महिला कंत्राटी डॉक्टरला नियुक्त करण्यात आले होते. मात्र या ठिकाणी आलेली डॉक्टर व्हॉटस्ॲपवर लसीचे टोकन बुक करण्यास मदत करीत असल्याची माहिती समोर आली. याहूनही गंभीर बाब म्हणजे ही डॉक्टर लसीकरण सुरू असतानाच मधूनच तीन-तीन तास गायब झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. वायल्सबाबत विचारणा करण्यासाठी नर्सिंग स्टाफने त्यांना मोबाईलवर संपर्क करीत त्या कुठे आहेत? अशी विचारणा केली असता त्यांनाही या डॉक्टरने 'मी कुठे आहे हे विचारण्याचा अधिकार तुम्हाला नाही,' असे उलट उत्तर दिल्याचेही समजते.
परिमंडळ सातच्या पालिका उपायुक्त डॉ भाग्येश्री कापसे, साहाय्यक आयुक्त संध्या नांदेडकर आणि स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांनी सदर केंद्राच्या तक्रारी वाढल्यानंतर घटनास्थळी भेट दिल्यावर डॉक्टरच्या गायब होण्याबाबत सवाल उपस्थित केला. त्यावेळी त्या प्रसाधनगृहात गेल्याचे कारण देण्यात आले. मात्र केंद्रातच प्रसाधनगृह असल्यामुळे डॉक्टर पालिका अधिकाऱ्यांचीही दिशाभूल करीत असल्याचे उघड झाले आहे. त्यानुसार पालिका अधिकाऱ्यांनी याबाबत नर्सिंग स्टाफकडे विचारणा केल्यास सगळा प्रकार उघड होईल. तसेच लोकांचा जीव धोक्यात टाकणाऱ्या डॉक्टरचा पर्दाफाश होईल असेही त्यांचे म्हणणे आहे.
मी कारवाई करण्याचे निर्देश दिलेत
मला याबाबत आधीही माहिती मिळाली असून आर दक्षिण विभागातील माझे सहकारी संदीप बनसोडे यांना याबाबत कारवाई करण्याचे मी निर्देश दिले होते. लसीकरण करताना डॉक्टरने गायब होणे हा प्रकार धक्कादायकच असून त्यामुळे एखाद्याच्या जिवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- संजय कुऱ्हाडे, पालिका उपायुक्त, आरोग्य विभाग
पालिकेकडे असणाऱ्या डॉक्टरची संख्या कमी
'आमच्या एकूण १६ लसीकरण केंद्रांमध्ये आम्ही डॉक्टरांची अदलाबदली केली आहे. मात्र कोणालाही काढण्यात आलेले नाही. दरम्यान, संतमंत अनुयायी आश्रम लसीकरण केंद्रावरील डॉक्टरच्या गायब होण्याबाबत मी नर्सिंग स्टाफकडे नक्की चौकशी करत योग्य ती कारवाई करीन. डॉक्टरची संख्या कमी असल्याने जर सदर डॉक्टरना कमी केले तर लसीकरण केंद्रदेखील बंद पडून परिणामी स्थानिकांची त्यामुळे गैरसोय होऊ शकते.
- संध्या नांदेडकर - साहाय्यक आयुक्त, आर दक्षिण विभाग
फोटो : संतमंत अनुयायी आश्रम येथे पालिका अधिकाऱ्यांची सर्पराइझ व्हिजिट.