लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मिठी नदीच्या पात्रातील गाळात सापडलेल्या दोन डीव्हीआरपैकी एक मुख्य आरोपी सचिन वाझे राहत असलेल्या ठाण्यातील साकेत सोसायटीतील, तर प्रिंटर त्याचा साथीदार विनायक शिंदेचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासह नदीत सापडलेली अन्य सामग्री मंगळवारी फॉरेन्सिक लॅबकडे पाठविण्यात आल्याचे एनआयएच्या सूत्रांनी सांगितले.
स्फोटक कार व मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील पुरावे तसेच संबंधित वस्तू वाझे व त्याच्या साथीदारांनी मिठी नदीच्या वांद्रे येथील पात्रात टाकले होते. एनआयएच्या तपास पथकाने रविवारी त्या ठिकाणी १२ पाणबुड्यांसह शोधमोहीम राबवली. गाळात अडकून पडलेले दोन डीव्हीआर, दोन हार्डडिस्क, प्रिंटर, सीपीयू जप्त केले. शिंदेच्या प्रिंटरमधून स्काॅर्पिओमध्ये उद्याेगपती मुकेश अंबानी यांच्या नावे देण्यात आलेल्या धमकीचे पत्र प्रिंट केले असल्याचा तपास अधिकाऱ्यांना संशय आहे. एक डीव्हीआर वाझेच्या साकेत सोसायटीतील, तर दुसरा पोलीस आयुक्तालयातील असल्याचे समजते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात त्याचे चित्रण झाले असल्याने त्यामध्ये वाझे, त्याचे साथीदार व हत्या झालेला मनसुख हिरेन हेदेखील असल्याने तो पुरावा वाझेने नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा संशय आहे. मात्र एनआयएने त्याचा शोध घेतला असून, फॉरेन्सिक लॅबमधून त्याची तपासणी केली जाईल.
...........................