ब्यू मॉन्डचे रहिवाशी वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2018 06:40 AM2018-06-16T06:40:35+5:302018-06-16T06:40:35+5:30
प्रभादेवीतील ब्यू मॉन्ड इमारतीला लागलेली भीषण आग विझली असली, तरी रहिवाशांना इमारतीत राहण्यासाठी सुमारे दोन आठवड्यांपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
मुंबई - प्रभादेवीतील ब्यू मॉन्ड इमारतीला लागलेली भीषण आग विझली असली, तरी रहिवाशांना इमारतीत राहण्यासाठी सुमारे दोन आठवड्यांपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. महापालिकेने इमारतीचे पाणी आणि वीज जोडणी तोडल्याने, बहुतेक रहिवाशांवर नातेवाइकांकडे आणि हॉटेलमध्ये राहण्याची वेळ आली आहे.
इमारतीच्या ३२ व ३३ मजल्यावर लागलेली भीषण आग शमविण्याचे काम गुरुवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सुरू होते. अखेर कूलिंग आॅपरेशन झाल्यानंतर, अग्निशमन दलाच्या जवानांनी इमारतीचा ताबा सोडला. मात्र, कूलिंग आॅपरेशन दरम्यान इमारतीच्या पॅसेजसह जिन्यांवर आणि मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक यंत्रणेमध्ये पाणी गेलेले आहे. त्यामुळे इमारतीमधील स्वयंचलित यंत्रणा कोलमडली आहे. परिणामी, इमारतीमधील गृहनिर्माण संस्थेने तत्काळ बैठक बोलावली आहे. इमारतीमध्ये राहण्यास कधी जायचे? या संदर्भातील निर्णय संस्थेच्या पदाधिकाºयांनी बोलावलेल्या बैठकीनंतरच घेण्यात येणार आहे.
दरम्यान, आग विझविल्यानंतर काम संपल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली, तसेच आग लागण्याच्या कारणाचा शोध सुरू असल्याचेही स्पष्ट केले. इमारतीमधील संपूर्ण वीज कनेक्शन तपासल्याशिवाय वीजपुरवठा पूर्ववत सुरू करणार नसल्याचे बेस्ट अधिकाºयाने सांगितले. परिणामी, तूर्तास तरी इमारतीमधील रहिवाशी गृहप्रवेश करण्याबाबत संभ्रमावस्थेत आहेत.
सुरक्षा रक्षकांचे कौतुक
रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढणाºया इमारतीमधील सुरक्षा रक्षकांचे कौतुक होत आहे. सोशल मीडियावर या सुरक्षा रक्षकांबाबतचा मेसेज व्हायरल झाला. यात ते काश्मिरी असल्याचा उल्लेख आहे. ते गेल्या १० वर्षांपासून येथे काम करत आहेत. आग लागली असता, जिवाची पर्वा न करता, त्यांनी रहिवाशांना सुरक्षितस्थळी नेले.