मुंबई: गणेशोत्सव, दहीहंडी उत्सव तोंडावर येऊन ठेपले असताना ढोलपथकेही सज्ज झाली आहेत. मात्र ढोलपथकांना या उत्सवांच्या तयारीसाठी सरावाला जागाच मिळेनाशी झाली आहे. मुंबईतील गजर, जगदंब आणि गिरगाव ध्वजपथक या प्रमुख पथकांची जागेअभावी कोंडी होत असून, त्यांचा सराव पूर्णपणे ठप्प झाला आहे.विल्सन जीमखाना येथे ही ढोलपथके वर्षानुवर्षे सराव करीत होती. विल्सन जीमखाना येथे जगदंब आणि गजर या पथकांनी रविवारी शेवटचे महावादन केले. यापूर्वी पथकांच्या सरावामुळे काही स्थानिकांनी तक्रारी केल्याने सराव कुठे करावा, असा प्रश्न पथकांपुढे उभा आहे. या तिन्ही पथकांमध्ये जवळपास ८०० वादकांचा समावेश आहे.एकीकडे इतकी मोठी पर्यायी जागा उपलब्ध नाही आणि मैदानांचे भाडे भरणे शक्य नाही. त्यामुळे सरावासाठी जागा उपलब्ध न झाल्यास उत्सवांमध्ये सहभागी होता येणार नाही, अशी भीती पथकांतील तरुणांनी व्यक्त केली आहे. ढोलपथकांमध्ये महिलांचा सहभाग असल्याने शहराबाहेर सराव करणेही सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ठरत नाही़ त्यामुळे सरावाच्या जागेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.जागेचा शोध सुरूशहरात सरावासाठी योग्य मैदान उपलब्ध नाही. सभागृह भाड्याने घेऊन सराव करण्याचा पर्याय असला तरी आर्थिकदृष्ट्या ते शक्य नाही. उपनगरांतील पथके हायवेवर सराव करतात़ त्यामुळे त्या पथकांना फारशी जागेची अडचण भासत नाही. परंतु शहरातील पथकांचा जागेचा शोध सुरू झाला आहे. - विघ्नेश सुर्वे, पथकप्रमुख, गजर
ढोलपथकांना सरावासाठी जागा मिळेना
By admin | Published: July 20, 2015 2:36 AM