भाडे भरण्यास आजपासून ई-बिलिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 01:19 AM2019-07-16T01:19:17+5:302019-07-16T01:19:28+5:30

आपत्कालीन दुर्घटना घडल्यास घरातून बेघर झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी शासनाने म्हाडाच्या संक्रमण शिबिराची उभारणी केली.

E-billing from today to pay fare | भाडे भरण्यास आजपासून ई-बिलिंग

भाडे भरण्यास आजपासून ई-बिलिंग

Next

मुंबई : आपत्कालीन दुर्घटना घडल्यास घरातून बेघर झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी शासनाने म्हाडाच्या संक्रमण शिबिराची उभारणी केली. मात्र या संक्रमण शिबिरातील घुसखोरी रोखण्यासाठी, त्यातील भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी तसेच आॅनलाइन भाडे वसुलीसाठी म्हाडाने आॅनलाइन यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारपासून सुरू होणाऱ्या या ई-बिलिंग सेवेमुळे गाळेधारकांना आॅनलाइन भाडे भरता येणार आहे. मंगळवारपासून या सेवेस सुरुवात करण्यात येणार असल्याचे म्हाडा मुंबई इमारत दुरुस्ती मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी जाहीर केले. यातून पारदर्शकता निर्माण करण्यात येत असल्याचा दावा म्हाडाने केला आहे.
म्हाडाच्या मुंबई मंडळात ५६ संक्रमण शिबिरे असून त्यात सुमारे २२ हजार कुटुंबे वास्तव्यास आहेत. त्यापैकी ८ हजार ५०० कुटुंबे घुसखोर असल्याचा अंदाज म्हाडामार्फत सांगण्यात येतो. हे घुसखोर फुकटात राहत असून म्हाडाला ३ हजार रुपये भाडे देण्यास तयार नाही. मात्र दुसºया बाजूला खरे रहिवासी पाचशे रुपये भाडे म्हाडाला दर महिना देत असतात. त्यामुळे मूळ रहिवाशांवर अन्याय होतो तर प्रत्यक्षात घुसखोरांकडून रहिवाशांना अनेक प्रकारचा त्रास होतो. तसेच हे भाडे वसूल करणाऱ्यांसाठीही म्हाडाकडे कमी कर्मचारी अहेत. यामुळे संक्रमण शिबिरांची ही थकबाकी वाढत चालली आहे. हे भाडे आता कोट्यवधींच्या घरामध्ये गेले आहे.
>पुढील बैठकीत धोरण निश्चित!
म्हाडाने २००८ मध्ये संक्रमण शिबिरातील रहिवाशांची यादी तयार करण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्ययावत पद्धतीने कोणतीही यादी तयार झालेली नसल्याने बायोमेट्रिकपाठोपाठ आॅनलाइन नोंदणीस आता महत्त्व लाभणार आहे. म्हाडाने काही विकासकांनाही संक्रमण शिबिरातील गाळे भाड्यावर दिले आहेत. मात्र बहुतांश विकासकांनी भाडे थकवल्याने आता हे भाडे कोट्यवधीत गेले आहे. अशा तेरा विकासकांवर म्हाडाने एफआयआर दाखल केला आहे. त्यामुळे पुढील प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये संक्रमण शिबिरांबाबत धोरण निश्चित करण्यात येणार असल्याचे घोसाळकर या वेळी म्हणाले.

Web Title: E-billing from today to pay fare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :mhadaम्हाडा