Join us

वाचकांसाठी ई-पुस्तकांची पर्वणी

By admin | Published: February 04, 2017 3:36 AM

साहित्य संमेलनात भरलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे शुक्रवारी सकाळी उद्घाटन झाले. हे प्रदर्शन वाचकांसाठी पर्वणी ठरते आहे. विविध प्रकाशक, वितरकांचे ३०० स्टॉल्स यात आहेत.

- जान्हवी मोर्ये,  पु.भा. भावे साहित्यनगरी (डोंबिवली)साहित्य संमेलनात भरलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे शुक्रवारी सकाळी उद्घाटन झाले. हे प्रदर्शन वाचकांसाठी पर्वणी ठरते आहे. विविध प्रकाशक, वितरकांचे ३०० स्टॉल्स यात आहेत. बालसाहित्य, ललित, वाङ्मयीन, प्रवासवर्णने, धार्मिक, काव्यसंग्रह, कथा-कादंबरी, विज्ञान, पाककृती, आहारविषयक त्याचबरोबर ई-पुस्तकांची दालने आकर्षण ठरत आहेत.ग्रंथाली प्रकाशनाने वाचकांसाठी चार सवलतीच्या योजना जाहीर केल्या आहेत. या योजना केवळ ९० वाचकांसाठी मर्यादित आहे. संमेलनाच्या पहिल्या दिवशी १२ वाचकांनी त्याचा लाभ घेतला. ग्रंथाली प्रकाशनाने खेड्यापाड्यांत पुस्तके पोहोचावी, यासाठी ग्रंथाली वाचक चळवळ सुरू केली होती. आता गावोगावी प्रकाशक व ग्रंथप्रदर्शन जात आहेत, हेच या चळवळीचे यश आहे. पण, दोन वर्षांपासून नवीन पिढी गॅझेटचा वापर करू लागली आहे. म्हणूनच, ग्रंथालीने एक अ‍ॅप सुरू केले आहे. त्यावर, ग्रंथाली प्रकाशनाची सर्व पुस्तके उपलब्ध आहेत. या सेवेसाठी वाचकांना काही मोबदला द्यावा लागत आहे. मात्र, तो पुस्तकांच्या छापील किमतीपेक्षाही अगदीच नगण्य आहे. याशिवाय, ‘शब्दरुची’ आणि काही जुनी मासिके या अ‍ॅपवर मोफत उपलब्ध होत आहे. येत्या सहा महिन्यांत अन्य प्रकाशकांची पुस्तकेही या अ‍ॅपवर उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे ‘ग्रंथाली’चे सुदेश हिंगलासपूरकर यांनी सांगितले. ‘ग्रंथाली’ने २०१५-१६ या वर्षात प्रसिद्ध केलेल्या ९० पुस्तकांच्या संचाची मूळ किंमत २२ हजार २२० रुपये आहे. त्यातील प्रत्येकी एक पुस्तक ९० रुपयांप्रमाणे हा ९० पुस्तकांचा संच वाचकांना सवलतीत आठ हजार १०० रुपयांत उपलब्ध झाला आहे. ग्रंथालीने प्रसिद्ध केलेले ६० काव्यसंग्रह सवलतीत ९०० रुपयांत उपलब्ध करून दिले आहेत. ग्रंथालीने प्रसिद्ध केलेल्या गुलजार यांच्या ९ पुस्तकांचा संच, ‘नोबलनगरीतील नवलस्वप्ने’ ७ पुस्तके, ‘सलीम सरांचा समीर’, ‘जुईच्या गोष्टी’ ही १८ पुस्तके १७०० रुपयांत उपलब्ध आहेत. ‘ग्रंथाली’तर्फे दरमहा ‘शब्दरुची’ मासिक प्रसिद्ध होते. त्याचा जानेवारीचा अंक साहित्य संमेलन विशेषांक आहे. त्याचे संपादन वीणा सानेकर यांनी केले आहे. शनिवारी त्याचे प्रकाशन होणार आहे. फेबु्रवारीचा अंक हा अखिल भारतीय साहित्य संमेलनानिमित्त मराठी भाषा विशेषांक आहे. त्याचे अतिथी संपादक प्रल्हाद जाधव आहेत. मार्चचा अंक स्त्री विशेषांक असून त्याचे संपादन सुलभा कोरे यांनी के ले आहे. या मासिकाची वर्गणी २५० रुपये असून तीन महिन्यांची एकत्रित वर्गणी दिल्यास ९०० रुपयांत अंक मिळणार आहेत. तसेच संकेतस्थळावरही वाचकांना बुकिंग करता येणार आहे. ‘मराठावाडा साहित्य परिषदे’ने दुर्मीळ ग्रंथ पुस्तक विशेषांक प्रदर्शनात मांडले आहेत. हे प्रदर्शन लक्षवेधी ठरले आहे. परिषदेतर्फे साहित्यातील योगदान याबद्दल लेखकांच्या कलाकृतीचा विशेष अंक काढला जातो. मराठवाड्यात दरवर्षी साहित्य संमेलन भरवण्यात येते. या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष किंवा मान्यवर साहित्यिक यांच्यावर हा विशेषांक असतो. संस्थेचे साडेतीन हजार सदस्य आहेत. त्या सगळ्यांना हा विशेषांक घरपोच केला जातो. हा अंक बाजारात कुठेही उपलब्ध होत नाही. आजच्या पहिल्या दिवशी तरी फारसा वाचकवर्ग या दुर्मीळ पुस्तकांना मिळालेला नाही. ही पुस्तके ४० पासून १५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत, अशी माहिती विक्रेते ज्ञानेश्वर निरवळ यांनी दिली. ई-साहित्य प्रतिष्ठानतर्फे दरआठवड्याला नवीन साहित्यकांची पुस्तके प्रकाशित केली जातात. ही पुस्तके ३ लाख ई-मेल आयडीवर दिली जातात. तसेच या फाइल वेबसाइटवरून डाउनलोड करता येतात. त्या पीडीएफ असल्याने वाचकांना वाचणे सोयीचे झाले आहे. मराठी भाषा वाढावी आणि मराठी वाचकांपर्यंत पोहोचावी, या हेतूने या उपक्रमाला २०१० च्या ठाण्यातील संमेलनातून प्रारंभ झाला. हा स्टॉल केवळ साहित्य संमेलनातच असतो. तेथे तीन सीडींमध्ये हे साहित्य उपलब्ध आहे. २०० रुपयांत ५०० पुस्तकांचा संच वाचकांना या माध्यमातून उपलब्ध होत आहे. या सीडीत गडकिल्ले, संत साहित्य आणि एक कथा, कादंबरी, नाटक, कविता, विनोद असे सर्व प्रकारचे साहित्य उपलब्ध आहे. ज्ञानेश्वरीची सोप्या मराठी भाषेत अनुवादित सीडीही येथे उपलब्ध असून त्याला जास्त मागणी आहे. सकाळपासून ई-साहित्याला वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे प्रतिष्ठानचे शशिकांत रनवारे यांनी सांगितले. कार्ड पेमेंट नसल्याने गैरसोयअनेक वाचकांनी क्रेडिट-डेबिटकार्ड पेमेंटविषयी विचारणा केली होती. परंतु, ही सुविधा उपलब्ध नसल्याने वाचकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. ही सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना अनेक बैठकांमध्ये करण्यात आली होती. परंतु, ती प्रत्यक्षात न उतरल्याने वाचकांची निराशा झाली.गद्रे बंधूंची पुस्तकसेवा एका क्लिकवर : डोंबिवलीतील गद्रे बंधूंची पुस्तकसेवा आता एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. या उपक्रमाचा प्रारंभ शुक्रवारी करण्यात आला. गद्रे यांच्या दुकानाला ७० वर्षे पूर्ण झाली व डोंबिवलीतील साहित्य संमेलनात यानिमित्ताने नवीन उपक्रम सुरू करण्यात आला. विविध नामांकित १८-१९ प्रकाशकांची ७ हजारांहून अधिक पुस्तके येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे. पुस्तकांची वर्गवारी करण्यात आली आहे. सर्वच वाचकांना पुस्तकखरेदीसाठी येता येणे शक्य नसते. त्यामुळे हा उपक्रम सुरू केल्याचे मयूरेश गद्रे यांनी सांगितले.