जन आरोग्य योजनेअंतर्गत ५५० लाभार्थ्यांना ई- कार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 03:30 AM2019-06-02T03:30:59+5:302019-06-02T03:31:14+5:30
मध्य आणि पश्चिम रेल्वे। लाभांबाबत जनजागृती करणार
मुंबई : रेल्वेमधील असंघटित आणि अकुशल कामगारांना आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत सामाविष्ट करण्यात आले आहे. या योजनेमुळे देशातील १० कोटी कुटुंबे आणि ५० कोटी व्यक्तींना लाभ होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
राष्ट्रीय स्वास्थ्य प्राधिकरणाने ‘आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजने’साठी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या सहकार्याने मुंबई सेंट्रल आणि सीएसएमटी येथे रेल्वे स्थानकावरील सामान्य सेवा केंद्राद्वारे आरोग्य शिबिरांचे शनिवारी आयोजन केले होते.
या शिबिरांद्वारे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंंतर्गत दिल्या जाणाऱ्या लाभांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी आहेत का, हे जाणून घेऊन व ई-कार्ड प्राप्त करून घेण्यात येणार आहे. शनिवारी या योजनेसाठी ५५० लाभार्थ्यांना ई- कार्ड प्राप्त झाले.
या वर्षाच्या सुरुवातीला रेल्वे मंत्रालयाने राष्ट्रीय स्वास्थ्य प्राधिकरणाबरोबर १७ प्रभागांतील ९१ रुग्णालये करारनामा स्वाक्षांकित करून अंगीकृत केली आहेत. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेबाबत रेल्वे रुग्णालयांमध्ये कार्यपद्धती सुरळीतपणे होण्यासाठी आणि जागरूकता वाढविण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मध्य व पश्चिम रेल्वे सोबत एकत्र येऊन काम करण्यात आले आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत जास्तीतजास्त गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून जनजागृती करण्याच्या आमच्या मोहिमेमध्ये रेल्वेने सहकार्य केले आहे, असे राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे म्हणाले. राज्य आरोग्य संस्थेबरोबरची भागीदारी सर्व रेल्वे कर्मचाºयांसाठी दर्जेदार आरोग्यसेवा सक्षम करण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल आहे, असे रेल्वेचे प्रधान मुख्य वैद्यकीय संचालक म्हणाले.