सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबईपामबीच मार्गावर सिग्नल तोडणाऱ्या ३२६ वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून या वाहनधारकांना पोस्टाने ई - चलन पाठवण्यात आले आहेत. मात्र त्यापैकी ७२ जणांचे पत्ते चुकीचे आढळून आले आहेत.नवी मुंबईचा नेकलेस समजल्या जाणाऱ्या पामबीच मार्गावर अपघाताचे प्रमाण अधिक आहे. धूम स्टाईलने या मार्गावर वाहने चालवली जात असल्याने अपघातही घडत आहेत. त्यापैकी अनेकांकडून सर्रास सिग्नल तोडला जातो. अशा वाहनचालकांच्या बेशिस्तपणाला लगाम घालण्यासाठी वाहतूक शाखेने या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्याद्वारे वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनचालकांवर नजर ठेऊन दंड आकारला जात आहे. त्याकरिता दंडाच्या रकमेची पावती ही ई-चलनद्वारे वाहनमालकाच्या थेट घरी पाठवली जात आहे. त्यानुसार गेल्या दोन महिन्यात वाहतूक पोलीस विभागाने ३२६ जणांना ई-चलन पाठवले. त्यापैकी १३८ जणांनी थेट वाहतूक विभाग कार्यालयात तर १९ जणांनी आॅनलाइन दंडाची रक्कम भरली. मात्र ५२ जणांनी ई-चलनाला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे या वाहनचालकांना वाहतूक शाखेतर्फे समन्स पाठवण्यात आली आहेत. दरम्यान काही प्रकरणांमध्ये वाहन चालकांचे पत्ते चुकीचे असल्याने त्यांना पाठवण्यात आलेले इर-चलन परत आले. वाहतूक सुरक्षेच्या अनुषंगाने ही बाब गांभीर्याची आहे. अशा वाहन चालकांकडून अपघात घडल्यास वाहनमालकाचा शोध घेणे अवघड होणार आहे. त्यामुळे यावर तोडगा काढण्याचे नवे आव्हान वाहतूक शाखेसमोर आहे. (प्रतिनिधी)
पामबीचवर वाहतूक शाखेची ई-चलनाद्वारे कारवाई
By admin | Published: November 20, 2014 1:14 AM