Join us

६७ हजार किलोमीटर धावली ई सायकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2021 4:04 AM

बीकेसीत एमएमआरडीएचा उपक्रम : कार्बन उर्त्सजन कमी होण्यास मदतलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी ...

बीकेसीत एमएमआरडीएचा उपक्रम : कार्बन उर्त्सजन कमी होण्यास मदत

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : वांद्रे-कुर्ला संकुलातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ई सायकल प्रकल्प सुरू केला असून, या ई सायकलने आजवर ६७ हजार किमी प्रवास केला आहे. विशेषत: ६ हजार ७०० किलोग्रॅम कार्बन उत्सर्जन कमी होण्यास यामुळे मदत झाल्याचा प्राधिकरणाचा दावा आहे. या प्रकल्पास वाढता प्रतिसाद पाहता येथे ५०० ई सायकलची व्यवस्था करण्यात आली आहे.

पर्यावरणीय प्रदूषण कमी करण्यासाठी एमएमआरडीएने वांद्रे-कुर्ला संकुलात ई सायकल प्रकल्प हाती घेतला आहे. ३१ जानेवारी २०२० रोजी युलूसोबत सामंजस्य करार करण्यात आला. ई सायकलचा वापर करण्यासाठी सुरुवातीला पाच रुपये व पुढील प्रत्येक मिनिटासाठी दीड रुपया याप्रमाणे दर आकारला जात आहे. यात प्रति महिना रिचार्ज सुविधा आहे. त्यानुसार वीस ते शंभर टक्के सूट देण्यात येते. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकाेनातून या ई सायकल सॅनिटाईज केल्या जात आहेत.

* नोव्हेंबरमध्ये सुमारे १० हजार प्रवाशांनी घेतला लाभ

बीकेसीत ३१ ऑगस्टपासून ई सायकल उपलब्ध झाली. येथील कर्मचारी आणि येथे येणारे नागरिक मिळून नोव्हेंबरमध्ये सुमारे १० हजार प्रवाशांनी या सेवेचा लाभ घेतला. ई सायकलमुळे वांद्रे आणि कुर्ला रेल्वे स्थानक जोडले गेले. सुरुवातीस येथे एकूण १८ स्थानके निश्चित करण्यात आली हाेती. प्रवाशांची मागणी पाहता या स्थानकांमध्ये वाढ करण्यात येत आहे.

..........................