आयसीटीकडून ई परीक्षांचा घाट; अभिमत विद्यापीठाला राज्य सरकारचा निर्णय लागू होत नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 01:41 AM2020-07-03T01:41:17+5:302020-07-03T01:41:56+5:30
विद्यार्थ्यांची संघटनेकडे धाव : आयसीटीकडून शासन निर्णयाचे उल्लंघन करून परीक्षांचा घाट का घातला जात आहे असा सवाल युवासेना कोअर कमिटी सदस्य साईनाथ दुर्गे यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे.
मुंबई: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे, संलग्नित महाविद्यालये, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठांमधील पदवी, पदव्युत्तर परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. यासंबंधी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून शासन निर्णय जारी केला आहे. व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या शिखर संस्थांकडून परीक्षा रद्दच्या निर्णयाला मंजूरी मिळणे बाकी आहे. मात्र, मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी (आयसीटी ) संस्थेकडून आपल्याला सदर शासन निर्णय लागू होत नाही, असे सांगत आॅनलाईन व ई मेलद्वारे परीक्षा घेत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे विद्यार्थी प्रशासन व विद्यार्थी संघटनांकडे धाव घेत आहेत.
आयसीटीकडून विद्यार्थ्यांसाठी जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात पदवी तसेच एमएस्सीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा १५ जुलैपर्यंत, तर पदवीच्याच पहिल्या ते तिसऱ्या वर्षाच्या विविध सत्रांच्या आणि एमएसस्सीच्या पहिल्या वर्षाच्या परीक्षा या १५ ते ३१ जुलै दरम्यान पार पाडल्या जाणार आहेत. त्या ई परीक्षा (इलेक्ट्रॉनिक ) माध्यमातून घेतल्या जाणार असून विद्यार्थ्यांना पहिल्या टप्प्यातील परीक्षांसाठी गुगल फॉर्म भरण्याच्या सूचना केल्या आहेत. परीक्षांचा निकाल ३१ जुलैपर्यंत लावण्यात येईल, असे ही या पत्रकात नमूद केले आहे.
याचप्रमाणे एटीकेटी व बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांनाही सूचना करण्यात आल्या आहेत. तिसºया, पाचव्या सातव्या सत्रांचे नवीन शैक्षणिक वर्ष १ आॅगस्टपासून सुरु करण्याचा संस्थेचा विचार असून परिस्थिती नियंत्रणात नसल्यास आॅनलाईन शिकविण्या सुरु होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून परीक्षेसंदभात घेण्यात आलेले निर्णय हे राज्यातील सर्व प्रकारच्या विद्यापीठांना लागू असल्याचे शासन निर्णय स्पष्ट करण्यात आले आहे. मग आयसीटीकडून शासन निर्णयाचे उल्लंघन करून परीक्षांचा घाट का घातला जात आहे असा सवाल युवासेना कोअर कमिटी सदस्य साईनाथ दुर्गे यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे.
तंत्रशिक्षण संचलनालयाचा दणका; पाठवले पत्र
उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून आयसीटीच्या कुलगुरूंना अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांबाबत शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश गुरुवारी रात्री देण्यात आले आहेत. तसे पत्र तंत्रशिक्षण संचालनालयाचे सहसंचालक प्रमोद नाईक यांनी आयसीटी कुलगुरूंना पाठविले आहे. साथरोग कायद्याअंतर्गंत आरोग्यविषयक उद्दभवलेल्या जोखमीमुळे व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा घेता येणार नाहीत. त्यासाठी राज्यातील सर्व प्रकारच्या विद्यापीठाच्या प्रशासनांना अंतिम परीक्षांबाबत कार्यवाही करावी याबाबत सूचना दिल्या आहेत.