मुंबई : परीक्षांच्या दिवसांत अचानक पडलेल्या सुट्टीत नेमकं करायचं काय हा प्रश्न मुलांना सतावत असताना सीबीएसई , आयसीएसई मंडळांच्या इंग्रजी शाळांप्रमाणे मराठी माध्यमाच्या शाळांनी ही आपल्या विद्यार्थ्यांसाठी मोबाईलवर इ लर्निंग सुरु केले आहे. सायन येथील शिव शिक्षण संस्थेच्या डी एस हायस्कुलचे इयत्ता सहावी ते दहावीचे नियमित वर्ग झूम ऍपच्या सहाय्याने भरवले जात आहेत. संचारबंदीमुळे घरात अडकून पडलेले विद्यार्थी ही मोबाईलवर भरणाऱ्या या शाळेत मन लावून अभ्यास करताना दिसत असल्याची माहिती शाळेच्या शिक्षकांनी दिली. विशेष म्हणजे कोरोनामुळे नववीच्या विद्यार्थ्यांची परीक्षाच अद्याप झालेली नसली आणि त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ते दहावीत गेले असे म्हणता येणे शक्य नसले तरी डी. एस. हायस्कूलने मात्र रोजचे दहावीचे वर्ग सुरू केले आहेत. डी. एस. हायस्कूलचे अध्यक्ष राजेंद्र प्रधान ह्यांनी अधिक माहिती देताना सांगितलं की, "दहावीची परीक्षा ही करिअरच्या निवडीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची परीक्षा आहे. म्हणूनच दरवर्षी १ एप्रिलपासूनच आम्ही शाळेत दहावीचे विशेष वर्ग सुरू करतो. त्यामुळे जूनमध्ये औपचारिक शाळा सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांचा किमान २५ टक्के अभ्यास झालेला असतो. सुरुवातीपासूनच अभ्यासात घेतलेली ही आघाडी विद्यार्थ्यांना वर्षअखेरीस खूप कामी येते. बोर्डाच्या परीक्षेआधी उजळणी करण्यासाठी त्यांना भरपूर वेळ मिळतो." यंदा मात्र कोरोना संचारबंदीमुळे शाळेत वर्गच भरवणे शक्य नाही. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकांनी झूम अॅपचा वापर करत मोबाईलवर दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीचे नियमित वर्ग घ्यायला सुरुवात केली आहे. एक एप्रिलपासून हे वर्ग मोबाईलवर भरत असून दररोज ४५ मिनिटांच्या तीन तासिका होत आहेत. सध्यातरी गणित, विज्ञान आणि इंग्रजी ह्या तीन विषयांची अधिकाधिक तयारी करण्यावरच शिक्षकांनी भर दिला आहे" असल्याची माहिती ही त्यांनी दिली.इयत्ता नववीतून इयत्ता दहावीत जाणा-या ५ तुकड्या असून त्यांत एकूण २८० विद्यार्थी आहेत. काही विद्यार्थी घरी, तर काही गावी आहेत. मात्र मोबाईलच्या माध्यमातून ८० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी नियमितपणे दहावीच्या विशेष वर्गाला उपस्थित राहत आहेत. आमचे शिक्षकसुद्धा हे वर्ग रटाळवाणे न होता हलक्याफुलक्या वातावरणात पार पडतील, ह्याची विशेष काळजी घेत आहेत", अशी माहिती डी. एस. हायस्कूलचे मुख्याध्यापक अंकुश महाडीक ह्यांनी दिली.यासाठी २७ मार्चपासून शाळेतल्या शिक्षकांना मोबाईलवर वर्ग कसे घेता येतील, या बाबत मार्गदर्शन केल्याची माहिती त्यांनी दिली.
.......................................................
सर्व विद्यार्थी मोबाईल-फ्रेंड्ली आहेत. एखादं अॅप डाऊनलोड करण्यापासून ते पासवर्ड सेट करण्यापर्यंतच्या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना सहज जमतात. पालकांच्या परवानगीनेच मोबाईल हातात मिळत असल्यामुळे सर्व विद्यार्थी अत्यंत मन लावून अभ्यास करतायत. त्यांनी केलेला अभ्यास आम्हाला पाठवतात. एरवी शाळेत वेळ न पाळणारी मुले सध्या सुरु असलेल्या मोबाइल वर्गांमध्ये मात्र चक्क वेळेवर हजर असतात.शुभांगी गायकवाड , पर्यवेक्षिका.......................................................
शाळेतील विज्ञानाचे शिक्षक डाॅ. संजय मोहिते सरांनी दहावीची पूर्वतयारी म्हणून आम्हाला झूम अॅपच्या माध्यमातून विज्ञानाचे धडे शिकवायला सुरूवात केली आहे. सुट्टीत घरी बसून कंटाळेलेलो असताना सरांच्या ह्या मोबाईल वर्गांमुळे अभ्यासाचा आनंद घेता येत आहे.- प्राजक्ता सोनावणे, विद्यार्थिनी इयत्ता नववी
.......................................................
- मोबाईल वर्गात विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातले सोपे भाग, अवांतर माहिती, हलक्याफुलक्या कविता, व्याकरण, शब्दसंग्रह आदी बाबी शिकवण्यावर भर दिला जात आहे.- इयत्ता आठवीसाठीची शिष्यवृत्ती तसेच होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षांच्या तयारीचेही वर्ग मोबाईलवर नियमितपणे होत आहेत.- शाळेच्या शिक्षकांसाठी दररोज सायंकाळी सहा ते सात ह्या वेळेत स्पोकन इंग्रजीचा वर्ग घेतला जात आहे.