लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई :
मागील मार्च २०२० पासून राज्यातील शाळा, शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, ग्रंथालये बंद असताना ई-कन्टेन्ट आणि साहित्याचा खूप मोठा उपयोग विद्यार्थी आणि साहित्य रसिकांना झाला, त्याचा आधार त्यांना लाभला. एकूणच माहिती प्रसारणाच्या क्षेत्रांमध्ये मोठे बदल होत असताना त्यादृष्टीने कालानुरूप ई-ग्रंथालये ही संकल्पना जगभरातील विद्यार्थ्यांना लाभदायक ठरताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ‘महाराष्ट्र ई - ग्रंथालय’ संकल्पना राबविण्यात यावी, अशी मागणी युवासेना शिष्टमंडळाने उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.
‘ई - ग्रंथालया’द्वारे व्यापक दृष्टिकोनातून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुस्तके, शैक्षणिक अभ्यासक्रमाचे निरनिराळे स्रोत, अत्याधुनिक व नवीनतम तंत्रज्ञानाची माहिती असलेले दस्तावेज, ई - पुस्तके, ई- जर्नल्स, विज्ञानविषयक जर्नल्स अल्पावधीत प्राप्त होण्यासाठी मदत होऊ शकणार आहे. इतकेच काय तर महाराष्ट्राचे ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक पैलू ‘ई - ग्रंथालय’ संकल्पनेमुळे संपूर्ण जगभरात पोहोचण्यास मदत होणार असल्याचे शिष्टमंडळाने उच्च व तंत्र शिक्षणमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ‘महाराष्ट्र ई - ग्रंथालय’ संकल्पना ‘वेब पोर्टल’ आणि ‘मोईईल ॲप’च्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी मागणी केली असल्याची माहिती युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी दिली आहे.
राज्यातील विविध भागांतील ग्रंथालये तग धरून वाचन संस्कृती टिकविण्यासाठी धडपड करत आहेत. या ग्रंथालयांनाच वाचविण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालय अधिनियम या कायद्यात बदल करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरू झाले आहेत. अपुरा निधी, जागा उपलब्ध नसणे, कर्मचाऱ्यांना मिळणारे तुटपुंजे मानधन, दिवसेंदिवस होणारी भाडेवाढ यामुळे राज्यभरातील ग्रंथालयांना घरघर लागली आहे. अशात ई-ग्रंथालयाची संकल्पना आणि मागणी ग्रंथालयासाठी नवसंजीवनी ठरू शकेल का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.