मुंबई - महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामध्ये ई-ऑफिस प्रणाली सुरु करण्याचे निर्देश व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील यांनी विभागांना दिले आहेत. त्यामुळे महामंडळामध्ये ई-ऑफिस प्रणाली लवकरच कार्यान्वित होणार सुरु असून, सोमवारी महा-आयटीच्या माध्यमातून अधिकारी-कर्मचाऱ्यांना याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले.
नागरिकांना जलद, पारदर्शक, कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून देण्यासोबत शासकीय कामकाज अधिक स्मार्ट व गतिमान होण्यासाठी राज्यात ई-ऑफिस प्रणाली राबविली जात आहे. ई-ऑफिसमध्ये एखाद्या विषयाची फाईल ही पूर्णपणे ऑनलाईनच सादर होत असल्याने फाईलींचा पसारा कमी होतो तसेच कामाची गती वाढते. आता महामंडळाच्या अंतर्गत प्रशासकीय कामासाठी-ई ऑफिस प्रणालीचा वापर केला जाणार असल्याने पेपरलेस कामकाजालाही गती मिळणार आहे. त्यामुळे फाईलींचा निपटारा वेळेत होण्यास मदत होणार असून कामात पारदर्शकता, गतिमानता देखील येणार आहे.
व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक संजय कृष्णाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महामंडळाच्या बैठक हॉलमध्ये संपन्न झालेल्या प्रशिक्षणासाठी मुख्य प्रशासकीय अधिकारी गीता देशपांडे, व्यवस्थापक (कलागारे) विजय भालेराव, उप मुख्य लेखाधिकारी राजीव राठोड, उप व्यवस्थापक (नियोजन व विकास) मुकेश भारद्वाज, सहाय्यक व्यवस्थापक (कलागारे) रुचिता पाटील, सहाय्यक व्यवस्थापक (कलागारे) मोहन शर्मा, व्यवस्थापकीय संचालक यांचे स्वीय सहाय्यक अनिता कांबळे, सांस्कृतिक समन्वयक मंगेश राऊळ यांसह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. या प्रणालीचा वापर कशाप्रकारे करायचा याबाबतची माहिती महा-आयटी तज्ज्ञ सुरेश सुरा यांनी प्रशिक्षणांच्या माध्यमातून महामंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिली.