हनिमूनला जाण्यासाठी हवाय आम्हाला ई-पास!, जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी अफलातून कारणे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2021 10:29 AM2021-06-07T10:29:28+5:302021-06-07T10:30:05+5:30
E-pass : मुंबईसह राज्यभरात कडक निर्बध लागू असतानाही नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडताना दिसले. मुंबईत तपासणीदरम्यान होणारी गर्दी टाळण्यासाठी पोलिसांकडून कलर कोडिंग सिस्टिम लागू करण्यात आली. मात्र, त्याचाही नागरिक गैरफायदा घेऊ लागल्यामुळे पोलिसांवर ताण वाढला.
मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यभरात ‘ब्रेक द चेन’अंतर्गत संचारबंदी लागू आहे. आंतरजिल्हा प्रवासासाठी २३ एप्रिलपासून ई-पास बंधनकारक करण्यात आला होता. या कालावधीत आतापर्यंत मुंबई पोलिसांकडे ई-पाससाठी १ लाख ५६ हजार ८११ अर्ज आले. त्यापैकी ७० टक्के अर्ज नाकारण्यात आले. यात काही महाभागांनी लग्नापाठोपाठ हनिमूनला जाण्यासाठी ई-पासची मागणी केली हाेती.
मुंबईसह राज्यभरात कडक निर्बध लागू असतानाही नागरिक मोठ्या संख्येने बाहेर पडताना दिसले. मुंबईत तपासणीदरम्यान होणारी गर्दी टाळण्यासाठी पोलिसांकडून कलर कोडिंग सिस्टिम लागू करण्यात आली. मात्र, त्याचाही नागरिक गैरफायदा घेऊ लागल्यामुळे पोलिसांवर ताण वाढला. अवघ्या आठवडाभरात या प्रणालीला गुंडाळावे लागले. त्यानंतर २२ एप्रिलपासून अतिरिक्त कठोर निर्बंधांचा समावेश करण्यात आला. यामध्ये अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय उपचार किंवा अशा प्रकारच्या टाळता न येण्यासारख्या कारणांसाठीच फक्त प्रवासाची मुभा देण्यात आली आहे आणि २३ एप्रिलपासून प्रवासासाठी ई-पास बंधनकारक करण्यात आला.
ई-पाससाठी नागरिक वैद्यकीय आणि अंत्यसंस्काराची कारणे देताना दिसले. तर काही ठिकाणी लग्नासाठीच्या कारणाचाही समावेश होता. तसेच हनिमूनला जायचे आहे, घर शिफ्टिंग तसेच प्रेमप्रकरणाचे काही किस्सेही समोर आले. मुंबई पोलीस प्रवक्ते चैतन्या एस. यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण १ लाख ५६ हजार ८११ अर्ज आले. त्यापैकी फक्त ५४ हजार ८२३ अर्ज मंजूर करण्यात आले. बहुतांश अर्ज कागदपत्रांंअभावी रद्द केले.
जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी काहीही
जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी अनेक जण वैद्यकीय तसेच नातेवाइकाच्या अंत्यसंस्कारासारखी विविध कारणे देताना दिसले. यात मे महिना असल्याने लग्न समारंभाची सर्वाधिक कारणे समोर आली.
सर्वांचीच मेडिकल इमर्जन्सी कशी?
यात मंजूर झालेल्या बहुतांश अर्जात वैद्यकीय कारणांचा समावेश आहे. पोलिसांनी मात्र पडताळणीनंतरच त्यांचे अर्ज मंजूर केले.
५४ हजार ८२३ अर्ज मंजूर
आतापर्यंत एकूण १ लाख ५६ हजार ८११ अर्ज आले. त्यापैकी फक्त ५४ हजार ८२३ अर्ज मंजूर करण्यात आले आहे.
-चैतन्या एस., मुंबई पोलीस प्रवक्ते